यवतमाळमध्ये आलेल्या कश्मीरच्या ट्रकमुळे खळबळ, आयबीच्या अलर्टनंतर पोलिसांची धावपळ

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

गुरुवारी घटलेल्या घटनांमुळे आणि आयबीच्या अॅलर्टमुळे यवतमाळ पोलिसांची जबरदस्त धावपळ उडाली. कश्मीरहून निघालेल्या एका ट्रकबाबत संशय निर्माण झाला होता. याबाबतची माहिती आयबीने यवतमाळ पोलिसांना दिली होती. ट्रक हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून तेलंगणा कडे जात होता. आयबीचा अॅलर्ट प्राप्त होताच हा ट्रक शोधून काढत त्याला अडवण्यासाठी यवतमाळ पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने हालचाली करायला सुरुवात केली. महाराष्ट्र- तेलंगाणाची सीमा ओलांडण्याच्या अवघे दोन किलोमीटर आधी हा ट्रक अडवण्याच पोलिसांना यश आले.

सुरुवातीला आयबीच्या अॅलर्टमुळे या ट्रकमध्ये दहशतवादी कारवायांसाठीचे सामान असावे किंवा दहशतवादी असावेत असा संशय निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांनी ट्रमधून आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली होती. सखोल चौकशी केली असता या ट्रकमध्ये फ्रुट ज्यूसच्या बाटल्याच असल्याचे स्पष्ट झाले ज्यानंतर पोलिसांना सुटकेचा निश्वास सोडला. या ट्रकबाबत संशय येण्याचे कारण म्हणजे हा ट्रक कश्मीर ते अयोध्येदरम्यान मालवाहतुकीसाठी अनेकदा वापरण्यात आला होता. अयोध्येत सध्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटनाची लगबग सुरू असून सुरक्षा यंत्रणा या कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. कश्मीरवरून अयोध्येत हा ट्रक वारंवार का आला होता? असा प्रश्न पडल्याने आयबीच्या अधिकाऱ्यांनी या ट्रकबाबत अॅलर्ट जारी केला होता.

हा ट्रक पांढरकवडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिथे आयबीचे पथकही दाखल झाले होते. त्यांनी ट्रकची कसून तपासणी केली आणि ट्रकमधील दोघांची बारकाईने चौकशी केली. दिवसभर ट्रकची चौकशी सुरू असल्याने यवतमाळमध्ये वेगाने अफवा पसरल्या होत्या. चौकशीनंतर ट्रक किंवा ट्रकमधील व्यक्तींमुळे कोणताही धोका नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.