Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसवर टीका करणं भोवलं; KCR यांना निवडणूक आयोगाची नोटीस

पहिल्या टप्प्यातील मतदानाला दोन दिवस असताना विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच काँग्रेस पक्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना महागात पडले आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी याप्रकरणी पत्रकार परिषदेत के. चंद्रशेखर राव यांना नोटीस जारी करत उद्या गुरुवारी 11 पर्यंत नोटीसीवर उत्तर मागितले आहे.

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जी. निरंजन यांच्यानी निवडणूक आयोगाकडे 6 एप्रिल रोजी एक तक्रार केली होती. के. चंद्रशेखर राव यांनी सिरिसिला येथील पत्रकार परिषदेत आपल्या विरोधात आक्षेपार्ह, अपमानजनक टीका केली, अशी तक्रार त्यांनी केली होती. या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली. के. चंद्रशेखर राव यांनी 5 एप्रिल रोजी सिरिसिला येथे पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षावर टीका करून आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी केसीआर यांना त्यांच्या भाषणाबाबत अनेकदा इशारा देण्यात आला होता, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाने के. चंद्रशेखर राव यांना नोटीस बजावली आहे. 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नोटीसला उत्तर द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे. दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे. महिलांबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना नोटीस बजावून महिलांचा सन्मान राखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा म्हणजे 16 मार्च 2024 पासून आचारसंहिता लागू झाल्यापासून आयोगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. निवडणूक आयोगाने या संदर्भात डेटा शेअर केला आहे. डेटामध्ये एकूण तक्रारींपैकी 51 तक्रारी भाजपच्या होत्या. त्यापैकी 38 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. तर 59 काँग्रेस पक्षाच्या असून त्यापैकी 51 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. इतर पक्षांकडूनही 90 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 80 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.