रंगपट – गुरुवर्यांची साथ आणि सुपरस्टारचा डबा…!

>>राज चिंचणकर

आयुष्याच्या काही टप्प्यांवरच्या आठवणींत रमले आहेत ज्येष्ठ वेशभूषाकार प्रकाश निमकर

वेशभूषाकार म्हणून या क्षेत्रात माझी एंट्री जरा गमतीशीर पद्धतीने झालेली आहे. मी ‘टूरटूर’ या नाटकात अभिनेता म्हणून काम करत होतो आणि ते माझे पहिले मराठी नाटक होते. एकदा अचानक दामू काका म्हणजे दामू पेंकरे यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि मला म्हणाले, ‘‘प्रकाश, मी काल तुझे गुजराती नाटक बघितले. तू चांगला अभिनेता आहेस, पण तुझी एपंदर शरीरयष्टी लक्षात घेता हीरोचा भाऊ किंवा त्याचा मित्र असे रोल तुला मिळणार. तू एक काम कर. तू वेशभूषाकार का होत नाहीस? कारण तू नेहमी उत्तम वेशभूषा करून येतोस आणि तुझ्याकडे बघितल्यानंतर तुला कपडय़ांची उत्तम जाण आहे हे लक्षात येते. मी आता एक नाटक दिग्दर्शित करत आहे, त्यात तू मला असिस्ट कर.’’ ते नाटक होते ‘अंमलदार.’ ज्यात मी अभिनयसुद्धा केला.

असेच एकदा दामू काका मला म्हणाले, ‘‘प्रकाश, मी तुला अहमदाबादला ‘नॅशनल स्कूल ऑफ डिझायनिंग’मध्ये पाठवतो. तिकडे गेल्यावर तुला क्लबची गुजराती नाटके मिळतील आणि तुला पैसेही मिळतील.’’ त्याप्रमाणे दामू काकांनी माझी व्यवस्था केली. तिथून शिकून, पदवी घेऊन मी पुन्हा इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आले की, मी या क्षेत्रात जास्त रमतोय. योगायोग म्हणजे वेशभूषाकार म्हणून मला पहिलेच नाटक विजय पेंकरे यांचे मिळाले आणि ते म्हणजे ‘असा मी असामी!’  त्या माझ्या पहिल्याच नाटकाला राज्य पुरस्कार मिळाला आणि तिथून माझे काम खऱया अर्थाने सुरू झाले.

नाटक आणि सिनेमा मिळून मला 19 राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आले की, दामू काकांनी मला त्या वेळी सांगितलेले अगदी योग्यच होते. सांगायचा उद्देश असा की, गुरू आपल्याला नुसताच घडवत नाही, तर तो पुढेही मदत करत असतो. ‘‘तू हे असे करू शकतोस आणि तुझ्यात ती क्षमता आहे,’’ असा सक्रिय पाठिंबा मला दामू काकांनी त्या वेळी दिला म्हणून मी आज या क्षेत्रामध्ये आहे आणि जे काही नाव कमावले आहे ते केवळ त्यांच्यामुळेच!

 मी खूप नशीबवान आहे. कारण माझ्या आयुष्यात आणि करीअरच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर मदत करणारी इतकी चांगली माणसे मला भेटली की, ज्यामुळे जीवन किती सुंदर आहे याचा मला अनुभव येत गेला. यात महत्त्वाचे एक नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे!  त्याच्याबरोबर मी ‘टूरटूर’ या नाटकात काम केले. आपल्या मित्रांनाही कामे कशी मिळत जातील हे तो आवर्जून पाहायचा आणि सर्वांची काळजी घ्यायचा. नाटकाच्या दौऱयाचा शेवटचा प्रयोग असेल तेव्हा पिंवा अगदी सिनेमाच्या शूटिंग शेडय़ूलच्या शेवटच्या दिवशीसुद्धा तो पार्टी द्यायचा.

मी शाकाहारी आहे हे त्याने नीट लक्षात ठेवले होते आणि माझ्या एकटय़ासाठी तो शाकाहारी जेवण घेऊन यायचा. सुरुवातीला एकदा त्याने नॉनव्हेज जेवण आणले होते तेव्हा मी कोपऱयात जाऊन बसलो होतो. तेव्हा लक्ष्या माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ‘‘अरे, तुला असे वाटते का, की मी तुझ्यासाठी काही आणले नसेल म्हणून. तुझ्यासाठी हा स्पेशल डबा आहे. यात संपूर्ण शाकाहारी जेवण आहे.’’ मला तेव्हा खूप भरून आले. कारण प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणारा असा हा सुपरस्टार.  त्याच्या जाण्यानंतर मी एका चित्रपटाचे शूटिंग त्याच्या वर्सोव्याच्या घराजवळ करत असताना लंच टाइमला मला लक्ष्याची खूप आठवण आली.  मला सेटवर नंतर शाकाहारी जेवण मिळाले खरे, पण लक्ष्याने माझ्यासाठी आणलेल्या त्या शाकाहारी डब्याची सर काही त्याला नव्हती.