Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; 21 राज्यांमधील 102 मतदारसंघांसाठी शु्क्रवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी थांबला. देशातील 21 राज्यांमधील 102 मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचाही समावेश आहे.

अठराव्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवार, 19 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे मतदानाच्या 48 तास अगोदर 102 मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या पाच मतदारसंघात मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुर्गम भागात हेलिकॉप्टरच्या मदतीने मतदान कर्मचार्‍यांना पोहोचवण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदा वयोवृद्ध मतदारांचे मतदान घरी जाऊन घेण्यात आले आहे.

अशा आहेत लढती
नागपुरात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे.
रामटेकमध्ये काँग्रेस सोडून मिंधे गटात आलेले राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत होत आहे. येथे वंचित बहुजन आघाडीने किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे.
चंद्रपूरला भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात सामना होत आहे.
भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी महायुतीचे सुनील मेंढे तर महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत होत आहे.
गडचिरोली-चिमूरमध्ये महायुतीने अशोक नेते तर महाविकास आघाडीने नामदेव किरसान हे मैदानात असून, वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी हे देखील नशीब आजमावत आहेत.
विदर्भातील पाच पैकी चंद्रपूर आणि रामटेक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भंडारा मतदारसंघात सभा झाली आहे.