Lok Sabha Election 2024 – विद्यमान खासदाराचा कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच तमिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. तमिळनाडूतील इरोड मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए. गणेशमूर्ती यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी ही घटना घडली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. A. Ganeshamurthi यांची तब्येत सध्या स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

रविवारी सकाळच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी कीटकनाशक घेतल्याचे निष्पन्न झाले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोयंबतूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांना अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सध्या त्यांच्या तब्येतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेऊन असून पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

ए. गणेशमूर्ती हे तमिळनाडूतील इरोड मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. 2019मध्ये मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघमच्या तिकीटावर ते लोकसभेमध्ये निवडून गेले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने द्रमुक पक्षातील नेत्यांनाही धक्का बसला आहे. याची माहिती मिळताच द्रमुक नेते एस मुथुसामी, कॅबिनेट मंत्री डॉ. सी सरस्वती, अन्नाद्रमुकचे नेते के.व्ही. रामलिंगम आणि अन्य नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.