बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 87 वर्षे होते. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली, जावई मुश्ताक अंतुले आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज आंबेत या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अंतुले यांचे चाहते, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बॅ. ए.आर. अंतुले यांनी आंबेतमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली, तेव्हा नर्गिस यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली.नर्गिस यांनी पहाटे 3 वाजता मुंबईतील मून लाईट निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव मुंबईहून आंबेत येथील मूळ गावी आणण्यात आले. दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.