NCP शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; सातारा, रावेरचे उमेदवार ठरले

महाविकास आघाडीने मंगळवारी पत्रकार परिषद घेत जागावाटप जाहीर केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपले 21 उमेदवार जाहीर केले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यात रावेर आणि सातारा येथील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अद्याप माढाच्या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे. रावेर आणि सातारा येथील उमेदवारांची घोषणा पक्षाच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन करण्यात आली आहे.

पक्षाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक 2024 ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया! अशी पोस्ट करत पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत. याआधी पक्षाने सात उमेदवारांची घोषणा केली आहे. बुधवारी आणखी दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त माढा येथील जागेसाठी उमेदवारी जाहीर करणे शिल्लक आहे.  महाविकास आघाडीच्या जागावाटपात माढा लोकसभा मतदारसंघाची जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. या जागेवर भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून या जागेवर उमेदवार असणार याचा सस्पेन्स कायम असून या जागेसाठी एक-दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.

सातारा येथील विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे शरद पवार यांच्याकडून साताऱ्यात उमेदराची चाचपणी करण्यात आली. आता साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, भाजपकडून साताऱ्यात अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे शशिकांत शिंदे यांची लढत कोणाशी होणार, याची उत्कंठा आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. पण एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर होती. अखेर बुधवारी श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. रावेरमधून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे.