संजय मंडलिकांची संपत्ती साडेपाच कोटींनी वाढली

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांची सध्या एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 रुपये असून, सन 2019च्या तुलनेत यामध्ये तब्बल 5 कोटी 65 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी या संपत्तीचे विवरणपत्र जोडले आहे. यामध्ये जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख 32 हजार 525 रुपये, तर 13 कोटी 21 लाख 95 हजार 873 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.

गेल्या निवडणुकीवेळी मंडलिकांची मालमत्ता 9 कोटी 51 लाख 71 हजार रुपये होती. आता वडिलोपार्जित मालमत्तेसह 14 कोटी 37 लाख 28 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत 5 कोटी 65 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

मंडलिक यांची संपत्ती
जंगम : 1 कोटी 15 लाख 32 हजार 525 रुपये. स्थावर : 13 कोटी 21 लाख 95 हजार 873 रुपये. वारसाप्राप्त मालमत्ता : 9 कोटी 20 लाख 91 हजार 520 रुपये. कर्ज : 3 कोटी 41 लाख 18 हजार. वाहने : स्कोडा, ऍक्टिव्हा. सोने : 35 लाख 92 हजार 500 रुपये.

मंडलिक बीए, बीएड
मुरगुड (ता. कागल) येथील मूळ रहिवासी असलेल्या मंडलिक यांनी सन 1989 मधून शिवाजी विद्यापीठातून एमए.ची पदव्युत्तर पदवी, तर कागलच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून त्यांनी 1992 मध्ये बी.एड. केले. त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.