जय श्रीराम, भारत माता की जय घोषणांनी देशातील समस्या संपणार का?

‘मी भारत मातेला आपली माता मानतो. मी हनुमानाचा भक्त आहे. प्रभू श्रीराम यांना मी देव मानतो. मात्र जय श्रीराम, भारत माता की जय या केवळ घोषणा देऊन देशातील महागाई, बेरोजगारी आदी समस्या संपणार आहेत का?’ असा जोरदार हल्लाबोल भाजप खासदार वरुण गांधी यांनी पेंद्रातील स्वपक्षाच्या मोदी सरकारवर केला.

देशातील प्रत्येक व्यक्ती महागाईने त्रस्त आहे. तरुणांना नोकरी नाही, रोजगार नाही. त्यामुळे उत्पन्न नाही. ज्या लोकांनी कर्ज काढले ते त्यांना परतफेड करता आले नाही तर मालमत्ता जप्त होईल. या सगळ्या समस्यांचा उपाय केवळ ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ या घोषणा नाहीत, असे वरुण गांधी म्हणाले.

महागाई प्रचंड वाढली

सात वर्षांत लोकांचे उत्पन्न प्रतिवर्षी केवळ एक टक्का वाढले. मात्र याच काळात महागाई प्रचंड वाढली. केरोसीनच्या किमती तब्बल अडीचशे टक्क्यांनी वाढल्या. दूध 50 टक्के, कांदा 70 टक्क्यांनी महाग झाला, असे वरुण गांधी यांनी सांगितले.

मांगी थी नौकरी,मिला आटा-दाल-चना

नोकरीच्या मुद्दय़ावर सरकार गप्प आहे आणि मोफत रेशन देते असे सांगताना वरुण गांधींनी शेरच्या माध्यमातून निशाना साधला. ‘तेरी मोहब्बत में हो गये फना, मांगी थी नौकरी मिला आटा-दाल-चना.’ मोफत रेशन हा कायमस्वरूपी उपाय नाह़ी  देश चालवणे मजाक नाही. संवेदनशील काम आहे, असे टीकास्त्र्ा त्यांनी सोडले.

उज्ज्वला योजनेवरून सरकारला घेरले

उज्ज्वला गॅस योजनेवरून मोदी सरकारला वरुण गांधी यांनी घेरले. सात कोटी लोकांना मोफत गॅस सिलिंडर्स दिल्याचे सरकार म्हणते. मात्र दुसरे सिलिंडर घ्यायची लोकांची ऐपत नाही. सिलिंडर 1100 रुपयांना झाले आहे. सामान्य लोकांनी जगायचे कसे? असा सवाल त्यांनी केला.

सरकारी विभागांमध्ये एक कोटी पदे रिक्त

सध्या विविध सरकारी विभागांमध्ये एक कोटी पदे रिक्त आहेत, अशी माहिती सरकारनेच दिली आहे. ही रिक्त पदे भरली का जात नाहीत? तुम्हाला (मोदी सरकार) पैसे वाचवायचे आहेत का? एक कोटी पदे भरली गेली तर लोकांना आधार मिळेल. मात्र सरकार हे विचार करत नाही, असे वरूण गांधी यांनी सुनावले.