वेब न्यूज – अब्जाधीश प्राण्यांच्या विश्वात

प्रातिनिधीक फोटो

>> स्पायडरमॅन

सगळय़ा अब्जाधीश लोकांविषयी सर्वसामान्य लोकांना कायम एक आकर्षण असते. त्यांची लाईफ स्टाईल कशी आहे, त्यांचे कपडे, त्यांच्या गाडय़ा, आलिशान बंगले याविषयी लोकांना एक कुतूहल असते. मात्र जगात अब्जाधीश फक्त माणसेच नाहीत तर काही प्राणीदेखील आहेत आणि ते प्रसिद्धदेखील आहेत. आलिशान राहणीमान, बंगले, गाडय़ा, अगदी नोकर-चाकरदेखील या प्राण्यांच्या दिमतीला हजर आहेत. Gunther VI नावाचा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत प्राण्यांपैकी एक आहे. Gunther VI कडे 500 मिलियन डॉलर्स अर्थात 4 हजार 132 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही सर्व संपत्ती त्याला त्याचे आजोबा Gunther III यांच्याकडून वारसाहक्काने मिळाली आहे. जर्मनीची काऊंटेस कार्लोटा लिबेंस्टिन हिने मरताना आपली 80 मिलियन डॉलर्सची संपत्ती Gunther III च्या नावावर केली. तिच्या मृत्यूनंतर या कुत्र्याच्या नावाने एक ट्रस्ट बनवण्यात आला, जो या संपत्तीची देखभाल करतो. गुंथर कॉर्पोरेशनने या संपत्तीची योग्य गुंतवणूक केल्याने आज ही संपत्ती 500 मिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. ऑलिव्हिया या प्रसिद्ध अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टच्या मांजरीकडे स्वतःच्या मालकीची पंपनी आहे. ऑलिव्हिया अभिनय क्षेत्रात कार्यरत असून ती जाहिरातींमध्येदेखील काम करते. एका जाहिरातीसाठी ऑलिव्हिया तगडी रक्कम आकारते. सध्या तिच्याकडे 97 मिलियन डॉलर्स म्हणजेच 800 कोटी रुपयांची संपत्ती आहे. नाला या इन्स्टाग्रामवर 40 लाख फॉलोअर्स असलेल्या मांजरीकडेदेखील 826 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिच्या मालकांनी तिच्या नावाने एक पॅट फूड पंपनीदेखील उघडलेली आहे.