दहा वर्षात महाराष्ट्राला दिले 16 लाख कोटी, अमित शहांनी मांडला आकड्यांचा बाजार

देशात कॉग्रेसची सत्ता असताना दहा वर्षात महाराष्ट्राला केवळ 1 लाख 91 हजार कोटीचा निधी मिळाला. मात्र त्यानंतर केंद्रात आलेल्या भाजपच्या मोदी सरकारने दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राला 16 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच महाराष्ट्राचा विकास दिसून येत आहे. तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपला पुन्हा एकदा संधी द्यावी, छत्रपती संभाजीनगरमधून कमळाला निवडूण आणा असे आवाहन करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आकड्यांचा बाजार मांडला.

छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज मंगळवारी देशाचे गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलतांना अमित शहा म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभक्त परिवर्तन घडविण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. केंद्रात काँग्रेसप्रणीत युपीएचे सरकार असताना दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील विकास कामांसाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यानंतर देशात परिवर्तन होऊन भाजपप्रणित एनडीएचे सरकार आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात महाराष्ट्राला ७ लाख १५ हजार ८९० कोटी इतका निधी दिला असून ८ लाख कोटीच्या प्रकल्पांना मंजूरी देत १६ लाख कोटी रुपयांचा निधी दिला. असा आकड्यांचा बाजार मांडला. महाराष्ट्रातील १ कोटी २० लाख लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना दिली. १ कोटी लोकांना आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ दिला. ७६ लाख महिलांसाठी वैयक्तिक शौचालय दिले. ७ कोटी लाभार्थीना ५ किलो धान्य दिले. ५१ लाख महिलांना उज्वला गॅस देण्यात आला. १२ लाख लाभार्थींना घरे दिली. एवढेच नव्हे तर कोरोना काळात दोन लसीच्या मात्रा मोफत देत १३० कोटी जनतेला कोरोनापासून संरक्षण दिले. दहा वर्षात महाराष्ट्रावर केलेल्या खर्चाचा हिशोब देण्यास आम्ही तयार आहोत, देशात कॉग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला दिलेला निधी आणि एनडीए सरकारने दिलेल्या निधीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी समोरासमोर बसावे असे आव्हान अमित शहा यांनी दिले.

देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी तिसर्‍यांदा मोदींना पंतप्रधान करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात दबदबा निर्माण केला.2047 पर्यंत देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी व तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला प्रचंड मतांनी निवडून द्या. महाराष्ट्रातून कोणत्याही परिस्थितीत मोदी यांच्या विचाराचे 45r खासदार निवडून द्यावेत असे आवाहन अमित शहा यांनी केले. यावेळी शहा यांनी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले.

शहा यांचे भाषण सुरू होताच लोक उठले

सभेसाठी आणण्यात आलेल्या लोकांनी अमित शहा यांचे भाषण सुरू होताच सभास्थळावरून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. अनेकजण उठून जात असल्याचे पाहताच शहा यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. तुम्ही पुन्हा भाजपला निवडूण देणार की नाही, छत्रपती संभाजीनगरमधून कमळ निवडूण आणणार की नाही, तिसर्‍यांदा मोदी यांना पंतप्रधान करणार की नाही असा सवाल करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

गर्दी जमविण्यासाठी तीन जिल्ह्याचे क्लस्टर

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर गर्दी जमविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि दक्षिण नगर या तीन लोकसभा मतदाासंघाचे क्लस्टर बनवून लोकांना आणण्यात आले. सभेला आणण्यात आलेल्या लोकांमध्ये कोणताही उत्साह दिसून आला नाही.

प्रत्येक खुर्चीवर केळी, पुरीभाजीचे पाकीट

सभेला आणलेल्या लोकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक खुर्चीवर केळी, भाजीपुरीचे पाकीट ठेवण्यात आले होते. लोकांनी अमित शहा यांचे भाषण सुरु होताच पुरीभाजी आणि केळीवर ताव मारला. अनेकांनी तर पुरीभाजीची नासाडी केली. सर्वत्र पुरीभाजीचे पाकिटे पडलेले दिसून आले.

हनुमान चालिसा पायदळी तुडवली

सभेला येणार्‍या नागरिकांना वाटण्यासाठी 50 हजार हनुमान चालिसा ची पुस्तके आणण्यात आली होती. हनुमान चालिसाची पुस्तके वाटल्यानंतर नागरिकांनी जागेवरच टाकून दिली. सभा संपताच हनुमान चालिसाची पुस्तके पायदळी तुडवली गेली.