ब्रेक फेल झालेला कंटेनर हॉटेलमध्ये घुसला; 10 जणांचा जागीच मृत्यू

दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हय़ातील सिंदखेडा येथील समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता धुळे – मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनरने दोन कारला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला अल्पोपहार आणि चहा विक्री करणाऱया हॉटेलमध्ये शिरला. कंटेनरच्या धडकेने अल्पोपहार करण्यास बसलेल्या नागरिकांपैकी 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर काहीजण गंभीर जखमी झाले.

आग्राहून मुंबईच्या दिशेने मालवाहतूक करणारा कंटनेर सोमवारी अपघातग्रस्त झाला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे कंटेनरवर नियंत्रण राहिले नाही. परिणामी अनियंत्रित कंटेनरने दोन कारला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला अल्पोपहार आणि चहा विक्री करणाऱया हॉटेलमध्ये कंटेनर शिरला. कंटेनरच्या धडकेने अल्पोपहार करण्यास बसलेल्या नागरिकांपैकी 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर काहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर उलटला. अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातात मरण पावलेल्यांपैकी काहींच्या मृतदेहाची ओळख पटविणे कठीण झाले. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातील जखमींना शिरपूर येथील जिल्हा उपरुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांपैकी काहींनी जखमींना तसेच अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी मदत केली. अपघाताची भीषणता कळल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार काशीराम पावरा यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताची भीषणता पाहिल्यानंतर उपस्थित सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.

मृतांची नावे- प्रतापसिंग भिमसिंग गिरासे (70), निर्मला तेरसिंग पावरा (15), मुरी सुरसिंग पावरा (28), सुनीता राजेश खंडेलवार (51), सुरपाल जवानसिंग राजपूत (32), कन्हैयालाल देविलाल बंजारा (46), पंकज पिंटय़ा पावरा (7), संजय जायमल पावरा (38), रितेश संजय पावरा (14).