14th Hockey India Senior Women’s National Championship : मध्य प्रदेशची विजयी सुरुवात, तर हॉकी बंगालने हॉकी गुजरातचा उडवला धुव्वा

14व्या राष्ट्रीय हॉकी इंडीया सीनियर महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेला नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. गतविजेत्या हॉकी मध्य प्रदेशने हॉकी छत्तीसगडला 8-0 ने पराभूत करत स्पर्धेत विजयी सुरूवात केली. तर दुसरिकडे हॉकी बंगालच्या संघाने हॉकी गुजरातचा 28-0 असा धुव्वा उडवला. तसेच हॉकी झारखंड आणि हॉकी कर्नाटकने सुद्धा विजयी सुरुवात करत स्पर्धेतील आपली दावेदारी सिद्ध केली. हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशला 13-0 असे हरवले. हॉकी तमिळनाडूने हॉकी तेलंगणा संघाला 2-0 च्या फरकाने नमवले. तर हॉकी कर्नाटकने हॉकी उत्तराखंडचा 6-0 ने पराभव करत विजयी सलामी दिली.

पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यात ए गटातील हॉकी मध्य प्रदेशने हृतिका सिंगने केलेल्या चार गोलच्या जोरावर छत्तीसगड हॉकीला 8-0 असे पराभूत केले. हृतिकाने 11व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलामध्ये रुपांतर करून खाते उघडले. त्यानंतर 17व्या, 22व्या आणि 33व्या मिनिटाला गोल करत गोलचौकार पूर्ण केला. मध्यंतराला 4-0 अशी आघाडी घेणार्‍या हॉकी मध्य प्रदेशने उत्तरार्धात आक्रमक खेळ करत अजून चार गोलांची भर घातली. प्रीती दुबे (24व्या मिनिटाला), ऐश्वर्या चव्हाण (46व्या मिनिटाला), अंजली गौतम (48व्या मिनिटाला) आणि साधना सेंगरने (57व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करत विजयाला हातभार लावला.

सी गटात हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशवर 13-0 असा सहज विजय मिळवला. संगीता कुमारीने (24, 54, 57 आणि 60व्या मिनिटाला) सर्वाधिक चार गोल केले. महिमा टेटेने चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. त्यानंतर, दीपिका सोरेंग (18 आणि 35व्या मिनिटाला), दीप्ती टोप्पो (24व्या मिनिटाला आणि 32 व्या मिनिटाला) तसेच सलीमा टेटे (25व्या), रजनी केरकेट्टा (35व्या मिनिटाला), दिप्ती कुल्लू (38व्या मिनिटाला) आणि निक्की कुल्लू (39व्या मिनिटाला) यांनी गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

एच गटात एकतर्फी लढत पहायला मिळाली. हॉकी बंगालने हॉकी गुजरातचा 28-0 असा धुव्वा उडवताना दिवसातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. होरो संजनाने (12, 20, 34, 47, 47, 53, 54, 54 मिनिटाला) तब्बल आठ गोल केले. तर सुष्मिता पन्ना हिने (13, 21, 36, 55, 57व्या मिनिटाला) पाच आणि मॅक्सिमा टोप्पो हिने (24, 28, 44 आणि 58व्या मिनिटाला) चार गोल करत होरो संजनाला सुरेख साथ दिली. मोनिका नाग हिने (7 आणि 15व्या मिनिटाला) पहिला गोल केला. सुश्मिता गंधाने (23 आणि 55व्या मिनिटाला), लिली ओरम (32, 32 आणि 45व्या मिनिटाला), कविता (40 आणि 59व्या), निधी साहनी (41व्या मिनिटाला) आणि अंजना डुंगडुंग (49व्या मिनिटाला) यांनीही गोल करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.

एच गटातील सामन्यात, तामिळनाडू हॉकी युनिटला विरुद्ध तेलंगण हॉकी यांच्यात अटीतटीची लढत रंगली होती. शेवटी तमिळनाडू हॉकी युनिटने तेलंगण हॉकी संघाला 2-1 अशा फरकाने पराभूत केले. सोनिया एस हिने 23व्या मिनिटाला पहिला गोल केला. तेलंगणकडून वर्शिथा मुप्पाला (39व्या) हिने गोल करत बरोबरी साधली. मात्र, सोनियाने 51व्या मिनिटाला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल करत तामिळनाडूला विजय मिळवून दिला.