कोपरगाव बाजार समितीत कांद्याला 1819 रुपये भाव

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात गुरुवारी (दि. 3) रोजी कांद्याला 1819 रुपये हा उच्चांकी भाव मिळाला, तर आवक 12,460 क्विंटल एवढी झाली आहे. कांदा नंबर 1 ला 1819 रु. ते 1425 रु. कांदा नंबर 2 ला 1400 रु. ते 800 रु. व कांदा नंबर 3 ला 700 रु. ते 300 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला, अशी माहिती सभापती साहेबराव रोहोम यांनी दिली.

कोपरगाव बाजार समितीमध्ये हमाली व तोलाई वगळता शेतकऱयाच्या पट्टीत कुठलीही कपात केली जात नाही. तसेच पैशांची हमी असून, 24 तासांचे आत रोख अथवा आरटीजीएसने पेमेंट केले जाते, असे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सांगितले. कोपरगाव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी बाहेरील राज्यातील व्यापारी आलेले असल्याने कांद्याचे बाजारभाव तेजीत असल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करूनच शेतमाल कोपरगाव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार समिती शिरसगाव-तिळवणी येथे विक्रीस आणावा व आपला आर्थिक फायदा करून घ्यावा, असे आवाहन सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, सचिव एन. एस. रणशूर व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.