नगरमध्ये 68 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई, 11 हजारांचा दंड वसूल

नगर परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आले असून, शुक्रवारी (दि.4) न्यू आर्ट्स महाविद्यालय परिसरात 68 टवाळखोरांवर कारवाई केली तसेच नियम मोडणाऱया पंधरा वाहनचालकांकडून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार भरोसा-निर्भया सेलच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहंडे-देशमुख यांनी तीन पथके तयार केली. साध्या वेशात फिरणाऱया पोलिसांनी महाविद्यालय आवारामध्ये तपासणी केली. न्यू आर्ट्स, रेसिडेन्सिअल हायस्कूल, सिद्धी बाग परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत अशा एकूण 68 टवाळखोरांना कायद्याचा हिसका दाखविण्यात आला. काहींना समज देण्यात आली, तर नियम मोडणाऱ्या 15 वाहनचालकांकडून 11 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहंडे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एस. के. शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल बी. बी. पोकळे, पोलीस कॉन्स्टेबल के. लेंडाळ, पोलीस नाईक एस. व्ही. कोळेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. टी. डिघुळे यांच्या पथकाने केली.