अदानीने एसीसी लिमिटेडचे मुख्यालय गुजरातला हलवले; महाराष्ट्रावर गुजरातचे आक्रमण सुरूच, तरीही मिंधे गप्पच

वर्तमानपत्रात कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या बदलासंबंधित सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई-महाराष्ट्राला लाखो रोजगार  देणारे प्रकल्प गुजरातला पळवण्याचे कारस्थान ‘मिंधे’ सरकारच्या डोळय़ांसमोर सुरूच असून आता ‘अदानी’ने चर्चगेट येथील एसीसी लिमिटेडचे कार्यालय गुजरातला हलवले आहे. यामुळे महाराष्ट्राला मिळणारा महसूल बुडणार असून शेकडो कामगार-अधिकाऱ्यांवर अचानक मुंबई सोडून गुजरातमध्ये स्थायिक होण्याची वेळ आली आहे. गुजरातकडून महाराष्ट्राची अशी लूट सुरू असताना ‘मिंधे’ सरकार गप्पच असल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  महाराष्ट्रात लाखो रोजगार देणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प गुजरातला पळवल्यानंतर 40 गद्दार आणि वर्ल्ड कप फायनल गुजरातला पळवली. यानंतर महाराष्ट्रातील डायमंड व्यवसाय संपवणारे बोअर्स डायमंड सेंटर सुरतमध्ये उभारण्यात आले. तर बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राची लूट आणखी वाढणार आहे. हे संकट घोंगावत असताना आता ‘अदानी’ने चर्चगेट येथील ‘एसीसी’ सिमेंटचे हेड ऑफिसही 9 मार्च 2024 पासून ‘अदानी कॉर्पोरेट हाऊस’, शांतीग्राम, वैष्णोदेवी सर्कलजवळ, एम.जी. हायवे, अहमदाबाद’ येथे हलवल्याबाबत एका आघाडीच्या वर्तमानपत्रात ‘कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या बदलासंबंधित सूचना’ही प्रसिद्ध केली आहे. म्हणजेच हेड ऑफिस गुजरातला नेल्यामुळे महसुलाचा फायदा गुजरातला होणार असून उत्पादन प्रकल्पातून निघणारे प्रदूषण मात्र इतर राज्यांना सोसावे लागणार आहे.

प्रतिष्ठेला धक्का, विकासाला फटका

 उद्योग विश्वात अनेक वर्षांची आणि हेरिटेज इमारत असा नावलौकिक असणारी चर्चगेट येथील ‘एसीसी’चे हेड ऑफिस हलवल्यामुळे मुंबईच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसणार आहे. शिवाय ‘सीएसआर’सारख्या निधीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांनाही फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

व्हीआरएस, नोकरी सोडण्यासाठी दबाव

गेल्या वर्षभरापासून हे कारस्थान सुरू असून मुंबईसह ठाण्यातील कार्यालयही रिकामे करण्यात येत आहे. यामध्ये 50 ते 55 पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना काही वर्षांसाठी अचानक परराज्यात स्थायिक होणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे एकतर गुजरातला स्थायिक होणे किंवा नोकरी सोडणे हाच पर्याय शिल्लक राहत आहे. कर्मचाऱ्यांवर ‘व्हीआरएस’ घेण्यासाठी दबावही आणला जात आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्या सोडण्यासाठीच हा दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर सध्या नोकरी मिळणे मुश्कील बनले असल्याने अनेकांवर गुजरातमध्ये स्थायिक होण्याची वेळ आली आहे.

नोकऱ्या जाणार, महसूल बुडणार

मुंबईत असणाऱ्या हेड ऑफिसमुळे स्थानिकांना उच्च पदांसह ज्युनियर आणि स्टाफसाठी आवश्यक असणाऱ्या शेकडो नोकऱ्या निर्माण होतात. भूमिपुत्रांना रोजगार मिळतो, मात्र आता अचानक हे ऑफिस अहमदाबादला हलवल्यामुळे या नोकऱ्या जाणार आहेत.

शिवाय मुख्य कार्यालयाच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या विविध सुविधांच्या गरजांमुळे मिळणारा महसूलही बुडणार आहे. म्हणजेच मुख्य कार्यालय गुजरातमध्ये असल्याने महाराष्ट्राला मिळणारा महसूलही बुडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.