राजकारणाचा चोथा झालाय! आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली खंत

लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणेच महाराष्ट्र राज्याचा कारभारही बाय द महाराष्ट्र, फॉर द महाराष्ट्र, वुईथ द महाराष्ट्र असा चालला पाहिजे हेच शिवसेनेचे व्हिजन आहे; पण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणाचा अक्षरशः चोथा झाला आहे, अशी खंत शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केली. 2022मध्ये शिवसेना पह्डली गेली, 2023मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एक परिवार पह्डला गेला, आता 2024मध्ये कॉंग्रेस पह्डायची तयारी सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर शरसंधान केले. सध्या महाराष्ट्र कसा चालवायचा त्याची नोट दिल्लीवरून येते आणि महाराष्ट्राचा कारभार गुजरातसाठी चालतोय, अशी टीका त्यांनी केली.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख नेत्यांबरोबरच आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी थेट आणि परखडपणे उत्तरे दिली. ज्या व्यक्तीने शिवसेनेशी गद्दारी करून स्वतःला विकले ती उद्या भाजपचीही होणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ही गद्दार मंडळी उद्या भाजपच्या लोकांची पदे मिळवायच्याही मागे लागतील, असेही ते पुढे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे एकनाथ शिंदे आणि 40 गद्दारांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही आणि त्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी आज दिला. गद्दारांनी केलेले कृत्य हे घटनाबाह्यच होते आणि राज्यातील खोके सरकार हे घटनाबाह्यच आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. गद्दार गेले ते गेले, आम्ही शिवसेना पुन्हा नव्याने बांधू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र कसा चालवायचा त्याची नोट दिल्लीतून येते
लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणेच महाराष्ट्र राज्याचा कारभारही चालला पाहिजे हेच आपले व्हिजन असल्याचे आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले. सध्या महाराष्ट्र कसा चालवायचा त्याची नोट दिल्लीवरून येते आणि महाराष्ट्राचा कारभार गुजरातसाठी चालतोय, अशी टीका त्यांनी केली. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणाचा चोथा झाला आहे. 2022मध्ये शिवसेना पह्डली गेली, 2023मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एक परिवार पह्डला गेला, आता 2024मध्ये कॉंग्रेस पह्डायची तयारी सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवरही शरसंधान केले.

गद्दारांच्या कथा सांगितल्या तर नेटफ्लिक्सचे 40 एपिसोड बनवावे लागतील

आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय चुकला का? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारीनंतर शिवसेनेतून सामान्य शिवसैनिक फुटलेला नाही, उलट शिवसैनिक आणि सामान्य नागरिक आमच्या अधिक जवळ आला. त्यांनी आमच्या सरकारचे काम बघितले. मी मंत्री असतो किंवा नसतो, राजकारणात असतो किंवा नसतो यापेक्षा प्रत्येक गद्दाराची स्टोरी सांगितली तर नेटफ्लिक्सचे 40 एपिसोड करायला लागतील आणि सर्व हसायला लागतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आशीष शेलारांना भाजपात विचारत नाही
भाजपशी दगाफटका करणाऱया पक्षांना दंडीत करा, असा आदेश अमित शाह यांनी दिला होता. त्यानुसार उद्धव ठाकरे यांना आम्ही दंडीत केले, अशा आशीष शेलार यांच्या वक्तव्याबद्दलच्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शेलार यांच्या कोणत्याही प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचे नाही असे सांगितले. ते म्हणाले की, आशीष शेलार यांना थेरपीची गरज आहे. कारण त्यांना भाजपात कुणीही भाव देत नाही. त्यांचे जॅकेट तयार असूनही त्यांना मंत्रिपद दिले जात नाही. त्यामुळे मला मनापासून त्यांच्याविषयी वाईट वाटते. त्यांच्याविषयी मला सहानुभूतीपलीकडे काहीही वाटत नाही.

गद्दारांच्या सरकारमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर

महाविकास आघाडीच्या काळात राज्यात शांतता होती. एकही दंगल झाली नव्हती. आंदोलकांना न्याय मिळत होता. गद्दारांच्या सरकारमध्ये राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली असून आमदार धक्काबुक्की करतात. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करतात आणि भाजपवाले त्याची बाजू घेतात. त्याचे सीसीटीव्ही फुटेज येत नाही. पण भाजपचा आमदार गोळीबार करतो तेव्हा पाच मिनिटांत सीसीटीव्ही फुटेज बाहेर येते असे सांगत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरही बोट ठेवले.

48 जागांमध्ये ईडीला किती आणि सीबीआयला किती

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय, असा प्रश्न या वेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आमच्या जागांबाबत सर्वच विचारणा करतात, पण भाजपप्रणीत खोके सरकारला मात्र कुणीच विचारत नाही. 32-12-4चा फॉर्म्युला आम्ही ऐकला होता. पण लोकसभेच्या 48 जागांमध्ये भाजपला किती मिळणार, खोके गँगला किती मिळणार, राष्ट्रवादीतील फुटलेल्या गटाला किती मिळणार, ईडीला किती मिळणार, आयटीला किती मिळणार आणि सीबीआयला किती मिळणार, असा खोचक प्रतिप्रश्नही आदित्य ठाकरे यांनी केला.

आमचा आकडा सांगितला तर भाजपवाले निवडणुकाच घेणार नाहीत
भाजपने देशात 400 प्लसचा, महाराष्ट्रात 45 प्लसचा नारा दिला आहे. आता तुमचा नारा काय, तुमचा आकडा किती अशा प्रश्नाला उत्तर देताना, आम्ही आकडय़ात जात नाही, आकडा सांगितला तर भाजपवाले निवडणुकाच घेणार नाहीत, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्रात 45 प्लस म्हणताहेत त्या जागा भाजपवाले एकटेच लढवणार की गद्दारांबरोबर लढवणार हेसुद्धा स्पष्ट करा, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे शंभर पर्याय, भाजपकडे एकच

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणतेही भांडण नाही. कोण कोणत्या मतदारसंघात जिंकू शकेल याची चाचपणी आम्ही करतोय. कारण आताचे सरकार पुन्हा केंद्रात बसले तर निवडणुका विसरूनच जा, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानही बदलले जाईल, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. लोकशाही आणि संविधानासाठी इंडिया आघाडी लढत असून आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी शंभर पर्याय आहेत, भाजपकडे फक्त एकच आहे, अशी खिल्लीही आदित्य ठाकरे यांनी उडवली.

प्रदूषणकारी उद्योग महाराष्ट्राला, रोजगार देणारे उद्योग गुजरातला
महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्याच्या भाजपच्या धोरणावरही आदित्य ठाकरे यांनी या वेळी टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक उद्योग महाराष्ट्रात येत होते. पण भाजपने त्यांची राखरांगोळी केली. जैतापूर, नाणार रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि दुसरीकडे पर्यावरणाला इजा न पोहोचवता रोजगार निर्मिती करणारे सेमीपंडक्टर, एअरबस, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्कसारखे उद्योग इगो इश्यू करून गुजरातला पाठवले गेले, याकडे आदित्य ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.