येथे विमान भाडय़ाने मिळेल! विमान व्यावसायिक मंदार भारदेंची गगनभरारी

अश्विन बापट

मंदार भारदे यांनी 12 वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाचा टेकऑफ झालाय, त्यांचा व्यवसाय आता खुल्या आकाशात विस्तारतोय. आज त्यांची स्वतःची तीन विमाने आहेत. त्यांचे मुख्य काम सध्या एअर ऍम्ब्युलन्स, कॉर्पेरेट क्लाएंट्सना विमान पुरवणे हे आहे. मंदार आणि त्यांची 40 जणांची टीम उद्योग क्षेत्रातलं हे नवं आकाश कवेत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मंदार भारदे यांची इतके वेगळे क्षेत्र निवडतानाची थॉट प्रोसेस काय होती, असे विचारले असता ते म्हणाले, मी सुरुवातीला  डॉक्युमेंट्री व्यवसायात होतो. तिथे एका असाइनमेंटमध्ये हेलिकॉप्टरची गरज होती जी परवानगी मिळाली नाही आणि तेव्हाच मी ठरवले की, आपण विमान क्षेत्रात पुढे जायचे. तिथपासून माझी सुरुवात झाली. आधी आई, वडील आणि आता बायको यांची खंबीर साथ यामुळेच मी आज इथवर मजल मारू शकलो. आईवडिलांनी नोकरीची वाट धरूनच करीअर कर, असा दबाव माझ्यावर आणला नाही. मला हा मोकळेपणा मिळाल्याने मी इथपर्यंत पोहोचलोय. आज माझी तीन विमाने आहेत. आमचे मुख्य काम एअर ऍम्ब्युलन्स, कॉर्पोरेट क्लाएंट्सना विमान पुरवणे हे आहे. आम्ही 11 राजकीय पक्षांना विमाने पुरवतो. वैद्यकीय क्षेत्रात याकरिता मोठे योगदान दिले जाऊ शकते, हे माझ्या लक्षात आल्याक्षणी आम्ही या फिल्डमध्ये आणखी कक्षा रुंदावतोय. कोविड काळात ही गरज आणखी अधोरेखित झाली. आजही आम्ही ऑर्गन ट्रान्सफरसारख्या सुविधेसाठी आघाडीवर आहोत. दोन वर्षांपूर्वी एका मुलीसाठी हातरोपण शस्त्रक्रियेकरिता आम्हीच चेन्नईहून मुंबई ही सुविधा दिली होती.

एमएबी एव्हिएशनची टॅगलाइन आहे 99.99 is not equal to 100. साधारणतः कंपन्यांची, प्रॉडक्टची पंचलाइन ही शब्दांत असते, आमची अंकांमध्ये आहे. त्यामुळे परिपूर्णतेचा, नेमकेपणाचा ध्यास घेऊन आम्ही पुढे जातोय. सध्या धार्मिक पर्यटनाकरिता आम्ही शिर्डी, गणपतीपुळे या ठिकाणी ग्राहकांसाठी विमान सुविधा पुरवतो. मंदार आणि त्यांची टीम उद्योग क्षेत्रातले हे नवे आकाश कवेत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय.

शेती, वनीकरण क्षेत्रात काम करण्याची इच्छा

भविष्यातल्या योजनांबद्दल बोलताना मंदार म्हणाले,  वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त वनीकरण आणि शेती क्षेत्रात आम्हाला काम करण्याची इच्छा आहे. आपल्या राज्यात प्रचंड मोठी वनजमीन आहे. मात्र कालौघात ही जंगले नष्ट होतात. तसेच जिथे माणसे पोहोचू शकत नाहीत, तिथे विमान किंवा हेलिकॉप्टर पोहोचू शकतात. तेव्हा वनीकरणासाठी याची कशी मदत होईल, यावर आमचे काम सुरू आहे. तसेच परदेशात शेतीमध्येही विमानांचा वापर केला जातो. औषध फवारणी, बीज पेरणी यासाठी विमानांचा उपयोग केला जाऊ शकतो. या बाबींवर सध्या मी लक्ष केंद्रित केलेय, असेही मंदार यांनी सांगितले.

 (लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)