अलिबागच्या वाडगावचा ‘माळीण’ होण्याचा धोका, अजित पवार गटाच्या माजी सरपंचाने डोंगर कापून माती विकली

‘माळीण’ हा शब्द उच्चारला तरी अजूनही अनेकांच्या अंगावर काटा येतो. अलिबाग तालुक्यातील वाडगावचे अजित पवार गटाचे माजी सरपंच जयेंद्र भगत यांनी डोंगर पोखरून माती विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याने या गावचा येत्या पावसाळ्यात ‘माळीण’ होण्याचा धोका आहे. भगत यांच्या या कारनाम्याने गावावर दरड कोसळण्याची भीती असून वाडगावातील हजारो ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. अजित पवार गटाच्या बगलबच्च्यांनी माती विकून सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. यासंदर्भात सरकारकडे वारंवार तक्रारी करूनदेखील राजकीय दबावामुळे याकडे वन आणि महसूल विभाग कानाडोळा करत आहे. सततच्या माती उत्खननामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? सरकार आमच्या मृत्यूची वाट पाहात आहे काय, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

डोंगराच्या पायथ्याशी वाडगाव वसले आहे. लालमातीचा हा संपूर्ण डोंगरच फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याची माती सर्रासपणे इतरत्र विकण्यात येते. डोंगराखालच्या जमिनीत प्लॉट काढून ते विकले जात आहेत. दुसरा डोंगर फोडून त्यावरील जमिनीवरदेखील कब्जा करण्याचा प्रयत्न माजी सरपंच जयेंद्र भगत करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डोंगर पोखरण्याचा गोरखधंदा सुरू असून वाडगावात एक हजार कुटुंबे राहतात. हे माती उत्खनन वेळीच थांबले नाही तर ‘माळीण’सारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

विधिमंडळातही उठवला होता आवाज

तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांनी काहीच लक्ष न दिल्याने शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी २२ ऑगस्ट २०२२ रोजी विधिमंडळात आवाज उठवला होता. त्यानंतरही प्रशासन कुंभकर्ण अवस्थेत असून लवकरात लवकर माती उत्खनन थांबवले नाही तर ग्रामस्थांच्या संतापाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

  • अलिबाग शहरालगत असलेल्या वाडगावातील ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाची सत्ता आहे. त्यामुळे तेथील पदाधिकारी व माजी सरपंच जयेंद्र भगत हे उघडपणे माती चोरून विकतात.
  • माती उत्खननाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा संपूर्ण प्रकार सुरू असून सरकारची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडत आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी वाडगाववासीयांनी केली आहे.
  • जयेंद्र भगत यांच्या गोरखधंद्याला रोखण्याची हिंमत वन व महसूल विभाग का दाखवत नाही, असा एकच प्रश्न विचारला जात आहे.