डीपीडीसीचा निधी पालकमंत्र्यांची जहागीर नाही! अंबादास दानवे यांनी भूमरेंची उतरवली

सत्तेच्या मस्तीत झिंगलेल्या मिंधे सरकारच्या दोन मंत्र्यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलीच उतरवली! जिल्हा नियोजन समितीचा निधी म्हणजे पालकमंत्र्यांची जहागिर नाही, अशा शब्दांत दानवे यांनी गद्दार पालकमंत्री संदिपान भूमरे यांना सुनावले. दानवे आणि भूमरे यांच्या वादात चोंबडेपणा करणारे दुसरे गद्दार मंत्री अब्दुल सत्तार यांनाही दानवे यांनी धू धू धुतले! दानवे यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी काही घडलेच नाही, अशी ओशटवाणी सारवासारव केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक झाली. बैठक सुरू होताच कन्नड येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार उदयसिंग राजपूत यांनी निधी वाटपात पालकमंत्री अन्याय करत असल्याबद्दल आवाज उठवला. मात्र पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी आक्रस्ताळेपणा करून राजपूत यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांनीही भूमरेंची वकिली करत निधी वाटपात अन्याय होत नसल्याची मखलाशी केली. हा सारा प्रकार पाहून संतप्त झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कशाप्रकारे निधी वाटप करण्यात आला, याची तालुकानिहाय माहिती देण्याची मागणी केली.

भुमरे, सत्तारांचा डीपीडीसीवर दरोडा

पालकमंत्री संदिपान भुमरे आणि अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार या दोघांनीच डीपीडीसीच्या निधीवर दरोडा घातला आहे. पैठण आणि सिल्लोड मतदारसंघातच सर्वाधिक निधी गेल्याचा आरोप मिंधे गटातूनच होत आहे. परंतु आजच्या बैठकीत मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट, प्रा. रमेश बोरनारे आणि प्रदीप जैस्वाल यांना पालकमंत्र्यांनी डोळे वटारून गप्प बसवले. मात्र बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार उदयसिंह राजपूत यांनी या अन्यायाला वाचा पह्डली.

जालन्यात भाजप-मिंधे गटातच जुंपली

जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधीही पालकमंत्री अतुल सावे आणि मिंधे गटात जोरदार जुंपली. मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी सावेंना अडवले तर सावेही मिंधे गटावर गलिच्छ भाषेत डाफरले. डीपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांना मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवून आमची कामे का होत नाहीत असा प्रश्न केला. भाजप केवळ आमच्यामुळे सत्तेत आहे, हे लक्षात ठेवा असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला. त्यातून दोन्ही गटात बाचाबाची झाली.

दानवेंची मागणी ऐकताच भुमरे सटपटले

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तालुकानिहाय निधी वाटपाची केलेली मागणी गैर नव्हती. बैठकीत तशी माहिती देणे अपेक्षित असताना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी अरेरावीची भाषा सुरू केली. त्यामुळे अंबादास दानवेही संतापले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. निधी वाटपाची माहिती मिळणे हा प्रत्येक आमदाराचा हक्क आहे, तो डावलता येणार नाही अशी ठाम भूमिका दानवे यांनी घेताच भुमरे बिथरले. भुमरेंनी आवाज चढवताच दानवे यांनीही ‘डीपीडीसीचा निधी म्हणजे तुमची जहागिर नाही. पालकमंत्री झाले म्हणजे जिल्हय़ाचे जहागिरदार नाहीत’ असे खडे बोल सुनावले. त्यावर भुमरे, सत्तार यांनी ‘हो, आमचे सरकार आहे, आमची जहागिर आहे. आम्ही वाट्टेल ते करू’ असे उद्दाम उत्तर दिले. आमदार उदयसिंग राजपूत यांनीही निधी वाटपात अन्याय होत असल्याने आपला रोष व्यक्त करीत कागदपत्र भिरकावली. हा वाद अधिक चिघळू नये म्हणून भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी केली.

…तर आणखी काही घडले असते : दानवे

मी शिवसैनिक आहे. अन्याय झाल्यावर चीड येणे आमचा स्वभाव आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपात अन्याय होत असल्याने आपण संतप्त झालो. मिंधे गटाचे मंत्री तथा पाकलमंत्री यांच्यासोबत आपण पूर्वी काम केलेले आहे. बैठकीत आणखी काही घडले असते, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. अन्यायकारक निधीवाटपासंदर्भात केवळ विरोधी आमदार नव्हे, तर सत्ताधाऱयांचे आमदारही आक्रमक झाले होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.