बाहेर काहीही बोला, मी सांगतो तेवढ्याच जागा मिळणार! मिंधे आणि दादा गटाला शहांनी ‘लायकी’ दाखवली

लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असेल तोच मतदारसंघ दिला जाईल, अवास्तव मागणी करू नका. बाहेर तुम्ही काहीही बोला, पण इथे मी सांगतो तेवढय़ा जागा घ्या आणि गप्प बसा. नाहीतर कमळ चिन्हावर निवडणूक लढा, असा प्रस्ताव भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जागावाटपाच्या बैठकीत ठेवत मिंधे आणि अजितदादा गटाला त्यांची लायकी दाखवून दिली.

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 जागांची मागणी केली. एवढय़ा जागा कशाच्या आधारावर मागता, उमेदवार कोण आणि कसे जिंकणार आहात, असे शहा यांनी दरडावताच शिंदे 18 जागांपर्यंत खाली आले. त्याचवेळेस अजित पवार यांनी आपल्याला शिंदे गटाला मिळतील तेवढय़ाच जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली. त्यावर अमित शहा यांनी जिंकण्याची क्षमता या एकाच निकषावर तुम्हाला जागा दिल्या जातील, असे स्पष्टपणे बजावले. शिंदे गटाला 10 आणि अजित पवार गटाला 4 अशा दोघांना मिळून जेमतेम 14 जागा मिळतील. फार फार तर 16 जागा दिल्या जातील. त्यासाठी कमळ चिन्हावर काही उमेदवार उभे करावे लागतील, असा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अजित पवारांसोबत बंद दाराआड चर्चा
मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत केवळ चारच जागा देऊ केल्याने अजित पवार नाराज झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन अजित पवार यांनी आज दुपारी पुन्हा अमित शहा यांच्याशी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर बंद दाराआड चर्चा केली, पण शहा यांनी आपली भूमिका कायम ठेवली. त्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत शहा यांनी चर्चा केली, पण त्यातून काहीच तोडगा निघाला नाही.

भाजप मुंबईतील चेहरे बदलणार
मुंबईतील सहापैकी पाच जागा लढविण्याची तयारी भाजपने केली आहे. दक्षिण-मध्य मुंबईची जागा शिंदे गटाला दिली जाईल. मुंबईत भाजपचे सध्या तीन खासदार आहेत. त्यांना बदलून नव्या चेहऱयांना मुंबईतून भाजपकडून संधी दिली जाणार आहे.

मिंधे गटाइतक्याच जागा अजितदादा गटालाही हव्यात
महायुतीमधील वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिंदे गटाला जितक्या जागा देणार तितक्याच जागा आम्हालाही हव्यात यावर अजितदादा गट अडून बसला आहे. भाजपने अधिक जागा घ्याव्यात, पण आम्हाला मात्र शिंदे गटाइतक्याच जागा द्याव्यात, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. अमित शहा यांनी जागावाटपाबाबत अजित पवार गटाच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केली. त्याबाबत छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गेल्या दोन दिवसांपासून आमचे नेते मतदारसंघांचा आढावा घेत असल्याचे सांगितले. जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यावर आणखी जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मिंध्यांसोबत गेलेल्या खासदारांना फटका
लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपकडून ठेवण्यात आले आहे. त्यासाठी युती, आघाडी करू. लढताना जागावाटप आणि उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता हाच फॉर्म्युला भाजपकडून देशभरात राबविण्यात येत आहे. त्याचा फटका भाजपमधील काही विद्यमान खासदारांना बसणार आहेच, पण सर्वात मोठा फटका शिवसेना सोडून मिंध्यांसोबत गेलेल्या गटातील विद्यमान खासदारांना बसणार आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीत जोर बैठका
दिल्लीत भाजप नेत्यांच्या दोन महत्त्वपूर्ण बैठका झाल्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई विभागीय अध्यक्ष आशीष शेलार, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर हे नेते उपस्थित होते. त्यानंतर रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासोबत राज्यातील नेत्यांची सविस्तर बैठक झाली.

फडणवीस म्हणतात, मित्रपक्षावर अन्याय होणार नाही
भाजपच्या मित्रपक्षावर जागावाटपात अन्याय होणार नाही. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एकदिलाने लढू, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

तुमच्या मागण्यांचं विधानसभेला बघू
13 खासदार माझ्यावर विश्वास ठेवून सोबत आले आहेत. त्यांना तिकीट द्यावे लागेल, असा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्यावर तुमच्यासोबत आलेल्यांना आमच्या चिन्हावर लढवा. लोकसभेसाठी आम्ही देऊ ते घ्या, बाकी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तुमच्या समाधानाचे बघू, अशा शब्दात अमित शहा यांनी शिंदे आणि अजित पवार गटाची बोलतीच बंद केली आहे.

राज्यात भाजप सर्वच जागा कमळ चिन्हावर लढवणार, बच्चू कडू यांचा दावा
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप सगळय़ाच जागा कमळ या चिन्हावर लढवणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवारही भाजपच्या चिन्हावर लढतील, असे कडू यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कमळ चिन्हावर काही उमेदवार उभे करावे लागतील, असा प्रस्ताव भाजपने मिंधे आणि दादा गटापुढे ठेवला.