भाजप चारशे पार गेल्यास राज्यघटना बदलणार! मोदी सरकारचा छुपा अजेंडा खासदाराने केला उघड

भाजपला संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत मिळाले की आपला धर्म वाचवण्यासाठी राज्यघटनाच बदलू, असे जाहीर वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले असून या विधानामुळे भाजपचा छुपा अजेंडाच उघड झाला आहे. या वक्तव्यावर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. घटना नष्ट करण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कुटील हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

खासदार हेगडे यांनी सिद्धपूर येथील एका सभेत पुन्हा घटनादुरुस्तीचा विषय उपस्थित केला. राज्य घटनेत काँग्रेसने ज्या काही चुका केल्या आहेत आणि अनावश्यक भर घातली आहे ते सुधारणारी घटनादुरुस्ती करण्यासाठी भाजपला संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. हिंदू धर्म वाचवण्यासाठी संविधान बदलणे आवश्यक आहे आणि भाजपने लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तरच भाजप हे करू शकतो, असे हेगडे म्हणाले.

संघ आणि भाजपवर काँग्रेसची टीकेची झोड

हे वक्तव्य म्हणजे पंतप्रधान मोदी व संघाच्या छुप्या हेतूंची जाहीर घोषणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना नष्ट करणे हेच यांचे अंतिम उद्दिष्ट आहे, अशी तोफ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डागली.