‘अॅपल’चे गोडावून फोडणारा झारखंडमधून अटकेत, एजंटमार्फत मोबाईल विकले, साथीदारांचा शोध सुरू

केसनंद रस्ता परिसरात असलेल्या अ‍ॅपल कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी करून तब्बल 266 मोबाईल चोरणार्‍या टोळीतीला एका लोणीकंद पोलिसांनी झारखंड राज्यातून अटक केली. तर, त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी एजंटच्या माध्यमातून मोबाईल विकल्याचे समोर आले आहे.

सलीम उर्फ असराऊल इस्माईल फजल शेख (35, रा. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 17 जुलै रोजी  केसनंद रस्त्यावरील अ‍ॅपलच्या गोडावूनमध्ये चोरीची घटना घडली होती. यावेळी चोरट्यांनी येथील गोडावूनमध्ये प्रवेश करून तब्बल 266 मोबाईल चोरी करून नेले होते. पसार आरोपींचा लोणीकंद पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. गुन्ह्याची पद्दत आणि यापुर्वीच्या अशा काही गुन्ह्यांच्या टोळ्यांचा अभ्यास केल्यानंतर झारखंडमधील साहेबगंज भागातील टोळ्या सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार लोणीकंद पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक गजानन जाधव यांचे पथक झारखंडमधील साहेबंगज येथे गेले. मात्र, आरोपी पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याने मिळाले नाहीत. यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पोलिसांचे पथक झारखंडला रवाना झाले. यावेळी सलीम शेख पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच, हा मुद्देमाल आरोपीने एका एजंटच्या माध्यमातून विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सलीमच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, रविंद्र गोडसे, अंमलदार स्वप्निल जाधव, वैâलास साळुंके, अजित फरांदे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.