फटके आणि फटाके – आता शेवटी दगाफटका नको

>> द्वारकानाथ संझगिरी

हे आत्तापर्यंत चांगलं चाललंय. रोहितच्या हल्ल्याने विरोधी संघाचे वेगवान गोलंदाज नामोहरम होत आहेत आणि विराट येऊन नांगर टाकतोय. मग मधली षटपं धावांचं दूध हळूहळू काढायला लागतो आणि शेवटी तो मोठे फटके मारतो. रोहितने झंझावाती सुरुवात केल्यामुळे अपेक्षित स्ट्राईक रेटचा दबाव त्याच्यावर पडला नाही. तो सेट झाला की शतकाकडे डोळे लावून असतो? आपलं काय जातं? शतपं ठोकत असताना तो जिंकण्याच भान सोडत नाही ते महत्त्वाचं.

इतरांपैकी राहुल सोडला, तर कुणी मोठी खेळी केलेली नाही. गिल, अय्यरची बॅट मोठय़ा खेळीचं वचन देते. पण मोठय़ा फटक्यांचा मोह आवरत नाही. मग वचन मोडलं जातं. त्यात आता लगेच पंडय़ा खेळणार नाही. गोलंदाजीची ताकत वाढवायची तर फलंदाज कमी करावा लागेल. भीती ही वाटते की रोहित- विराटपैकी कुणी लवकर बाद झाले तर काय? ते भीष्म नाहीत म्हणजे इच्छामरण त्यांना नाही. समजा चेंडू चांगले स्विंग झाले किंवा तीन-चार चांगले पडले आणि ते त्या दोघांच्याच वाटेला आले तर मागे कोण उभं राहणार? आपण उपांत्य फेरीत जवळपास पोहोचलो आहोत. एखाद्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यावर फलंदाजी घेऊन पाहावं. इतरांना सराव मिळाला तर ते फायदेशीर आहे. एखाद् दोन मोठे स्कोअर पाठीशी असणं फलंदाजाला आत्मविश्वास देतं. मधल्या आणि खालच्या फळीची परीक्षा होणं गरजेचं आहे.
2019 ला हिंदुस्थानी संघ असाच भरात होता. उपांत्य फेरीत तीन चांगल्या चेंडूने आपलं स्वप्न भंग झालं. रोहितची आधीची पाच शतपं, विराटची अर्धशतपं हा इतिहास ठरला. वर्तमान नेहमीच इतिहासाचं ऋण मानतो असं नाही. डॉन ब्रॅडमनला इतिहासाने विचारलं नाही. शेवटच्या डावात नियतीने त्याला शून्यावर बाद केलं. नियती इतकी क्रूर की, त्याला दुसरा डावसुद्धा दिला नाही.

ऑस्ट्रेलिया डावाने जिंकली. ब्रॅडमनची सरासरी 100 होऊ शकली नाही. ती 99.94 वर थांबली.

म्हणून वाटते एकदा धर्म, नकुल, सहदेव यांच्यावर थोडी जबाबदारी पडू देत. तो अनुभव मिळू देत. छिद्र बुजवयाची असतील तर आत्ताच बुजूदेत. यावेळी शेवटपर्यंत दगाफटका नको.