दीर्घायु भव : सुपरफूड मिलेट्स

>> वैद्य सत्यव्रत  नानल

धान्य प्रकार म्हणजे संस्कृतमध्ये ज्यांना शुक धान्य वर्ग किंवा इंग्रजीमध्ये मिलेट्स म्हटले जाते तो वर्ग. आयुर्वेदात याचे दोन वर्ग केलेले आहेत. एक वर्ग जो मनुष्याच्या नियमित खाण्यासाठी वापरला जातो आणि दुसरा क्षुद्र धान्य वर्ग, जो मानवी शरीरास पोषण देण्यास फार समर्थ किंवा सक्षम नाही असा. थोडक्यात जो नियमित खाऊ नये असा.

नियमित खाल्ल्या जाणाऱया शुक धान्य वर्गात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका असे प्रकार येतात, तर क्षुद्र धान्य वर्ग प्रकारात नाचणी, कोद्रव, कांग (छोटय़ा पक्ष्यांना खायला घालतात) वगैरे प्रकार येतात.

शुक धान्य म्हणजे एकदल वनस्पती. शिंबी धान्य म्हणजे द्विदल वनस्पती म्हणजेच कडधान्य, तर सध्या या शुक धान्य म्हणजे मिलेट्सचा जमाना सुरू होतो आहे. यातील क्षुद्र धान्य वर्गातून फार पोषण मिळत नाही असे आयुर्वेदाचे मत आहे. म्हणजे याचा अर्थ, ही सर्व धान्य टाकाऊ आहेत असा नाही तर यांचे नेमके फायदे लक्षात घेऊन मग यांचा वापर आवश्यक तिथे करावा असे आयुर्वेद म्हणतो.

सामान्य धान्य प्रकार जसे गहू, तांदूळ आज लोकांना पचेनासे होत आहेत. अनेक रोग निर्माण करण्यात त्यांचा हातभार लागत आहे. याचे कारण पेस्टी साईड वापरून केलेली शेती आहे. नवीन पिढी याच्या विळख्यात अडकलेली आहे. त्यामुळे त्यांना पर्याय म्हणून इतर धान्य प्रकार प्रचलित केले गेले तर त्यात वावगे ठरणार नाही. शुक धान्य प्रकार हे एक वर्ष जुने असावेत असे आयुर्वेद म्हणतो.

गहू – शरीरातील मांस, हाडे भरून काढणारा हा धान्य प्रकार आहे. अतिशय पोषक आहे. भरपूर व्यायाम करून याला पचवावे लागते.

तांदूळ -सामान्यतः तांदूळ जेवणात नाही असे पूर्वी कधीच व्हायचे नाही, पण हाही सध्या लोकांना पचेनासा होत चालला आहे. शुगर वाढते म्हणून लोकांनी खायचा कमी केला आहे.

ज्वारी – ही महाराष्ट्राची खरी ओळख. पूर्वीपासून महाराष्ट्रात बाराही महिने घरात खाल्ली जाणारी ती म्हणजे ज्वारी. कोणत्याही ऋतूमध्ये ही चालते. ही कोरडी असते. त्यामुळे बद्धकोष्ठता असलेल्यांनी आपापल्या वैद्यांच्या सल्ल्याने पद्धत ठरवावी.

बाजरी – प्रचंड पोषक, मांस, हाडे दणकट बनवायची असतील तर यासारखा पदार्थ नाही. पचनास जड, त्यामुळे थंडीत खावी. गव्हापेक्षा बाजरी उत्तम, यात वाद नाही.

नाचणी – आयुर्वेदानुसार हा एक क्षुद्र धान्य प्रकार आहे. यात पोषणमूल्य फारच कमी असते. ही पचायला थंड आणि हलकी असते. याच्या सेवनाने लघवीला होण्याचे प्रमाण वाढते, परंतु जास्त प्रमाणात किंवा नियमित सेवन केले बद्धकोष्ठ, पोटदुखी, पोटफुगी निर्माण होते.

ओट्स – सध्या खूप प्रसिद्ध झालेला शुक धान्य प्रकार म्हणजे ओट्स. ओट्स हा अख्खा प्रकार शक्यतो मिळत नाही. प्रोसेस केलेले ओट्स फ्लेक्स, रोल्ड ओट्स असे प्रकार मिळतात. प्रोसेस केलेले अन्न शक्यतो कमीच खावे. ओट्स ही खाणे असेल तर हळूहळू सवय लावावी. नीट शिजवून खावे, अन्यथा अपचन होते.

मका – आयुर्वेदानुसार वजन कमी करायचे असेल तर मका सर्वात उत्तम. पोषण उत्तम करतो, परंतु यानेही पोटफुगी, पोटदुखी असे प्रकार होतात. आतडय़ांना कोरडेपणा येतो. त्यामुळे आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण हा खावा.

 कांग ः लव्हबर्ड, चिमण्यांसारखे पक्षी आवडीने याचा बारीक दाणा फोडून आतील गर खातात. याचे टरफल वातूळ असते. पचले नाही तर त्रास देते.

यव – याला बार्ली नावाने प्रसिद्धी मिळालेली आहे. प्रचंड थंड आणि लघवीला वाढवणारा असा पचनास कोरडा, पण हलका प्रकार आहे. याचाही वापर नाचणीसारखा करावा. भाकरी वगैरे चांगली बनते. गहू पिठात सम प्रमाणात यवाचे पीठ मिसळून फुलके करावेत. सोबत एरंडेल हवेच. मधुमेही रुग्णांना उत्तम फायदा होतो. बार्ली वॉटर नावाने याचे पाणी मिळते.

[email protected]