मुद्दा- भटक्या कुत्र्यांचा त्रास

>> वैभव मोहन पाटील

भटक्या  कुत्र्यांचा त्रास समाजाला नवा नाही. मात्र त्याकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष अनेकांच्या जिवावर उठत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वाघ-बकरी चहा’चे मालक पराग देसाई यांच्या मृत्यूमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. देसाई यांच्यासमोर अचानक आलेले कुत्रे आणि कुत्र्यासमोर अचानक आलेला माणूस यामुळे अपघात होऊन, ‘ब्रेन हॅमरेज’मुळे त्यांचा मृत्यू झाला. देसाईंच्या मृत्यूनंतर भुंकणाऱ्या कुत्र्यांची दहशत किती आहे, तेही समोर आले. रागिष्ट असलेल्या जातीचे कुत्रे पाळण्याची सध्या फॅशन सुरू झाली आहे. अनेक देशांमधे कुत्र्यांच्या ज्या जातींना पाळण्यास बंदी आहे, त्या जातीदेखील आपल्याकडे वाढलेल्या दिसतात. तसेच रस्त्यावरील फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा त्रास सर्वांनाच होत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे घडणाऱ्या घटनांमागील कारणे शोधणे आणि त्या कारणांवर योग्य मार्ग काढणे अत्यंत आवश्यक आहे.

कुत्री मागे लागतात, तेव्हा त्यातून वाचण्याच्या प्रयत्नांत गाडी चालकांचा अपघात होतो. दुचाकीस्वार असंख्य वेळा जखमी होतात किंवा काही वेळा त्यात जीवही जातो. लहान मुलांना चावा घेण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. यासाठी  प्रशासन, विविध सामाजिक संस्था व प्राणिप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन उपाययोजना राबवायला हव्यात. अपघात, लहान मुलांना चावलेली कुत्री यांमुळे समाजात एक प्रकारच्या दहशतीचे वातावरण निर्माण होते. चालायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना भीती वाटणे स्वाभाविक आहे.  कुत्र्यांची संख्या अफाट वाढू न देण्यासाठी नसबंदी, लसीकरण गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या आणि सामान्य नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या वर्षी राज्यात जुलैअखेरीस जवळपास साडेतीन लाख लोकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे. मुंबईत याच काळात तब्बल चाळीस हजार लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

अनेकदा पहाटे व रात्री हल्ला करणाऱ्या या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा? हा एक प्रश्न बनला आहे. राज्यात 2017 पासून आतापर्यंत तब्बल 35 लाख 49 हजार 616 लोकांना कुत्रे चावले असून यात रेबीजमुळे तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण मृत्यू पावलेले आहेत. मुंबईच्या सर्वच भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून तो थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची पालिकेची उपाययोजना तोकडी पडत असल्याने वेळोवेळी कुत्र्यांचा बंदोबस्त करा ही मागणी अनेकांनी अनेकदा केली गेली. पालिका कायदा, 1888 मध्ये भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची तरतूद असून 1993पर्यंत भटक्या कुत्र्यांना मारले जात होते. मात्र प्राणिमित्र संघटनांनी त्याविरोधात केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या मारण्यावर बंदी घातली आहे. परिणामी राज्यात व मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे.

मुंबईत 2014 मध्ये कुत्र्यांची संख्या मोजण्यात आली होती तेव्हा 95 हजार भटक्या कुत्र्यांची नोंद पालिकेने केली होती. सध्या ही संख्या दोन-तीन पटीने अधिक असेल. सर्वसामान्य नागरिकांना रात्री अपरात्री तसेच पहाटेच्या वेळेस कुत्र्यांचा होणारा व्यापक त्रास पाहता राज्यस्तरावरून सरकारी नियोजन गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांनी ठोस कृती कार्यक्रम राबवावा.