भायखळ्यात दोघांकडून 1023 किलोची भांग जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई शहरातील नशेबाजांना झिंगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांगचा साठा करून तो विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-2 ने रंगेहात पकडले. त्या दोघांकडून तब्बल 1023 किलो वजनाची व 22 लाख 78 हजार रुपये किंमतीच्या विविध ब्रँन्डच्या भांगचा साठा हस्तगत करण्यात आला.

दक्षिण मुंबईतील नशेबाजांना विकण्यासाठी भांगचा साठा घेऊन एक जण भायखळा येथील जीजामाता भोसले उद्यान परिसरात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र.2 ला मिळाली. त्यानुसार या पथकाचे प्रमुख निरीक्षक प्रकाश काळे, दुय्यम निरीक्षक प्रज्ञा राणे, लक्ष्मण लांघी तसेच विनोद अहिरे या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार मकसुद टांक (59) हा तिथे येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्याने विकण्यासाठी आणलेला विविध ब्रँन्डचा 25 किलो भांगचा साठा मिळून आला. छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भांग भरून ठेवलेली होती. टांककडे अधिक चौकशी केल्यावर साकी विहार रोड येथील तुंगा गावात अब्बास गफूर सय्यद (61) या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात भांगचा साठा असल्याची माहिती समोर आली. त्यनुसार पथकाने तुंगा गावात धडक देऊन अब्बास सय्यद ने ऐकेठिकाणी विविध गोण्यांमध्ये साठवणुक करून ठेवलेला 21 लाख 45 हजार किंमतीचा विविध ब्रँन्डचा भांगचा साठा मिळून आला. अशाप्रकारे शहरात बेकायदेशीरपणे भांगची विक्री करणाऱ्या दोघांना पकडून एक हजार 26 किलो भांगचा साठा हस्तगत करण्यात आला.

कानपुरहून यायची भांग

अब्बास हा भांगचा मुख्य पुरवठादार आहे. तर टांक हा अब्बास कडू भांग घेऊन ती विविध ठिकाणी जाऊन विकतो. कानपुर येथुन मोठ्या प्रमाणात भांग अब्बास मुंबईत आणतो. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांचा हा गोरगधंदा सुरू असून निरीक्षक प्रकाश काळे व त्यांच्या पथकाने अखेर दोघांचा गोरखधंदा उद्धवस्त केला.