Chandrayaan 3 Update – विक्रम लँडरची ‘हनुमान उडी’, चंद्रावर पुन्हा केलं सॉफ्ट लँडिंग; इस्त्रोने दिली माहिती

हिंदुस्थानची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चांद्रयान-3’ यशस्वी झाले असून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले विक्रम लँडर अपेक्षेपेक्षाही चांगले काम करत आहे. एकीकडे प्रज्ञान रोव्हर स्लिप मोडमध्ये गेले आहे, तर दुसरीकडे विक्रम लँडर आपल्या करामती दाखवत आहे. विक्रम लँडरने नुकतीच चंद्रावर हनुमान उडी घेतली आहे. ‘इस्त्रो’ने याबाबत आधी काही माहिती दिली नव्हती. मात्र हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ‘इस्त्रो’ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

‘इस्त्रो’ने चांद्रयान-3 बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. विक्रम लँडरने पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. विक्रम लँडरने चंद्रावर 40 सेंटीमीटरवरून उडी घेतली आहे. यादरम्यान विक्रमने 30 ते 40 सेंटीमीटर अंतरही पार केले. विक्रम लँडरने आपल्या उद्दिष्ठापेक्षाही अधिक चांगले काम केले आहे. उडी मारण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे, अशी माहिती इस्त्रोने दिली.

इस्त्रोने कमांड दिल्यानंतर विक्रम लँडरचे इंजिन सुरू झाले आणि ते हवेत 40 सेंटीमीटर वर गेले. त्यानंतर आपल्या पहिल्या जागेपासून 30 ते 40 मीटर अंतरावर लँडिंग केले. भविष्यात चंद्रावरील चाचणीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्याच्या आणि मानवरहित मिशनच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.

दरम्यान, विक्रम लँडरचे सर्व भाग आणि यंत्र व्यवस्थित कार्य करत आहेत. उडी मारण्याआधी विक्रम लँडरचे रँप, चास्टे आणि इल्सा पेटोल्डस बंद करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. त्याधी प्रज्ञान रोव्हरला स्लिप मोडमध्ये टाकण्यात आले. चंद्रावर सध्या अंधार असून सूर्योदय झाल्यानंतर रोव्हरला पुन्हा उर्जा मिळेल आणि ते कार्यान्वित होईल.