शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी हर्णे बंदरातील मासेमारीला फटका, नौका समुद्रात न लोटता किनाऱ्यावरच उभ्या

शासनाने जाहीर केलेला 1 जून ते 31 जुलैदरम्यानचा 61 दिवसांचा माशांच्या प्रजोत्पादनाचा निर्धारित मासेमारी बंदीचा काळ संपुष्टात आल्याने शासनाकडून मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे, मात्र हर्णे बंदरातील मासेमारी शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी बदलत्या हवामानाचा मासेमारीला फटका बसला आहे. त्यामुळे मासेमारांनी मासेमारीसाठी आपल्या नौका समुद्रात न लोटता सुरक्षिततेच्या दृष्टीने किनाऱ्यावरच उभ्या करून ठेवण्यास पसंती दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठी जिल्हयात दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. या बंदरात मासेमारी करणाऱ्या परवानाधारक साधारणपणे 850 लहान मोठया मासेमारी बोटी नोंदणीकृत आहेत. 1 जून ते 31 जुलै हा दोन महिण्याचा काळ माशांचा प्रजोत्पादन काळ लक्षात घेत दरवर्षीच शासनाकडून या दोन महिण्याच्या कालावधीत यांत्रिकी नौकांना मासेमारीची बंदी घालण्यात येते. त्यानुसार, मासेमारी बंदीचा दोन महिन्याचा काळ हा 31 जुलै रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट 2023 रोजी मंगळवार या शुभदिनी मासेमारांनी आपल्या नौकांची विधीवत पूजाअर्चा करत मासेमारीसाठी नौकांना समुद्रात लोटण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र मासेमारी शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी अचानकपणे बदललेल्या हवामानाचा फटका बसला आणि 1 ऑगस्ट रोजी हर्णे बंदरातील मासेमारीचा शुभारंभ हुकला. त्यामुळे एकही नौका मासेमारीसाठी समुद्रात लोटण्यात आली नाही.

हर्णे बंदराची ख्याती ही मासेमारी बंदर असल्याने या बदरात सकाळ संध्याकाळ असे दोन वेळा दररोज मासळीची लिलाव प्रक्रिया पार पडत असते. दररोज लाखोंची आर्थिक उलाढाल होणारे हे बंदर असल्याने मासेमारी हंगामात हर्णे बंदरावरील तसेच हर्णे बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या व्यवसायाला बरकत येते. त्यामुळे मासेमारी काळात येथे सुगीचे दिवस असतात. असे असले तरी मागील काही वर्षे मासेमारीचा व्यवसाय हा अनिश्चितीचा व्यवसाय झाला आहे. कधी बदलत्या हवामानाचा मासेमारीस फटका बसतोय, तर कधी एलईडी लाईटद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात मासळी सापडत नाही, तर कधी एलईडी वा फास्टर मलपी बोटींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मासेमारांना आपला मासेमारी व्यवसाय बंद ठेवून रस्त्यावर उतरून शासनाकडे दाद मागावी लागते. त्यामुळे मासेमारांचा सर्वाधिक काळ हा मासेमारीऐवजी तो वाया गेला आहे. हे वास्तव असताना यावर्षीच्या मासेमारीच्या शुभारंभाचा पहिलाच दिवस हवामान बदलाने मासेमारांचा मासेमारीविनाच गेला आहे. समुद्र शांत कधी होणार आणि आपल्या नौका फिशिंगला कधी लोटल्या जातील. हवामान बदलाच्या वातावरणाने खवळलेला समुद्र शांत कधी होणार याकडेच मच्छिमारांचे लक्ष लागले आहे.