Lok Sabha Election 2024 : निवडणूक प्रचारात भाऊ-बहिणीविषयी वादग्रस्त विधान, कॉँग्रेसकडून पोलिसात तक्रार; अटकेची मागणी

निवडणुकीच्या प्रचारसभेत कॉँग्रेसवर टीका करताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरली. पंतप्रधान मोदींसमोरच मुनगंटीवार यांनी असभ्य भाषेचा वापर करत भाऊ-बहिणीविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानाचा सर्वत्र निषेध होत असून राज्यसभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसने मुनगंटीवार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करत अटकेची मागणी केली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असणाऱया मुनगंटीवार यांनी भाऊ-बहिणींच्या नात्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चंद्रपूर येथे झालेल्या सभेत हजारो महिला समोर बसलेल्या असताना कॉँग्रेसवर टीका करताना मुनगंटीवार यांनी अश्लील शब्दाचा वापर केला. काँग्रेस कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी मुनगंटीवार यांच्याविरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रचारसभेत असंस्कृत भाषेचा वापर केल्याने चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार अडचणीत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांना नेटकरी ट्रोल करीत आहेत.

मुनगंटीवारांकडून सारवासारव
यावर मुनगंटीवार यांनी, माझ्या भाषणाची अर्धवट क्लिप फिरवली जात आहे. आणीबाणीदरम्यान विरोधकांची माहिती काढण्यासाठी कसे अत्याचार केले त्याचा तो संदर्भ होता, अशी सारवासारव केली. शीख दंगलीत निरपराध शीख धर्मीयांना मारणारे हुकूमशहा कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला.

अशा विचारांना जनता योग्य धडा शिकवेल – विजय वडेट्टीवार

मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱया अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य धडा शिकवेल, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा – अतुल लोंढे
चंद्रपूरचे भाजप उमेदवार मुनगंटीवार यांची चंद्रपूर येथील प्रचारसभेतील भाषा चिथावणीखोर व दोन समाजांत शत्रुत्व निर्माण करणारी आहे. त्यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी कॉँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे मुनगंटीवार यांच्याविरोधात तक्रार दाखल करत केली आहे.