काँग्रेस नगरसेवकाच्या भावाचे 36 लाख थकवले, 2 वर्ष जेवणाचे पैसे न दिल्याने कॅटररचा सेवादलाच्या कार्यक्रमात गोंधळ

राजस्थानातील अजमेरमध्ये काँग्रेसच्या सेवादलाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाला सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई देखील आले होते. कार्यक्रमस्थळी आलेल्या एका माणसाने थेट देसाई यांना गाठत त्यांच्याकडे 36 लाख रुपये देण्याची मागणी करायला सुरुवात केली. हे पैसे आपल्या हक्काचे असून ते तुम्ही थकवलेत असं म्हणत या व्यक्तीने तिथथे गोंधळ घातला. मिलन खंडेलवाल असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा खानपानसेवा पुरवठ्याचा व्यवसाय आहे. गोंधळ वाढत जाताना दिसल्याने सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आणि इतर नेत्यांनी मिलन खंडेलवाल याची समजूत काढत बाजूला नेलं.

मिलन खंडेलवाल हा कॅटरर असून त्याच्या तो खंडेलवाल केटरींगचा मालक आहे. 2019 साली सेवादलाचं राष्ट्रीय अधिवेशन होतं. यासाठी मिलन याला जेवणाचं कंत्राट देण्यात आलं होतं. यासाठी त्याला 71 लाख रुपये देण्यात येणार होते. यापैकी 35 लाख रुपये मिलनला देण्यात आले होते, मात्र उर्वरीत 36 लाख नंतर देऊ असं सांगण्यात आलं. 2 वर्ष मिलनने सेवादलाच्या नेत्यांकडे फेऱ्या मारल्या मात्र त्याला ही रक्कम मिळाली नाही. इतकी मोठी रक्कम थकल्याने मिलन याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत होता. ही रक्कम थकवली असल्याची माहिती त्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याही कानावर घातली होती. मात्र तरीही त्याला त्याची रक्कम परत मिळाली नाही. जर आपल्याला ही रक्कम परत मिळाली नाही तर आत्महत्या करेन अशी धमकी मिलन याने दिली आहे. मिलन याचा भाऊ हा काँग्रेस नगरसेवक आहे. तरीही त्याला हक्काचे पैसे मिळवण्यात इतक्या अडचणी येत असल्याचं पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पैसे परत मिळाले नाही तर त्यासाठी सेवादलाचे नेते डॉ.रघू शर्मा जबाबदार असतील असं मिलन याने म्हटलंय.