दापोली कृषी विद्यापीठातील डॉ. संतोष सावर्डेकर यांना अमेरिका येथील ‘मिशीगन विद्यापीठा’कडून निमंत्रण

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. संतोष सावर्डेकर यांना अमेरिका मिशीगन येथे होणाऱ्या कृषि जैवतंत्रज्ञान, जैवसुरक्षा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण या विषयावर मिशीगन स्टेट विद्यापीठ अमेरिका येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.  जागतिक पातळीवरील आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी 25 देशांतील जनुकीय परिवर्तीत पिके या संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सहभाग असणार आहे.
जागतिक तंत्रज्ञान प्रवेश, कार्यक्रम या मिशिगन स्टेट विद्यापीठ येथे सुरु असलेल्या प्रकल्पांतर्गत दिनांक 5 ऑगस्ट, 2023 ते 18 ऑगस्ट 2023 दरम्यान ही कार्यशाळा होणार आहे. जनुकिय परिवर्तन पिकांच्या संशोधनाची दिशा, जैवसुरक्षेचे नियम आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी धोरणे यावर विचार मंथन करण्यात येणार असून अमेरिकेतील मिशीगन, ओहीओ, आयोवा आणि वॉशिंग्टन येथील जैवतंत्रज्ञानावर आधारित उद्योजक, शेतकरी आणि कृषि विद्यापीठे यांना भेटी आणि त्यांचे अनुभव आदान प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये डॉ. सावर्डेकर भारतातील पारजनुकीय पिकांच्या संशोधनाची दिशा या विषयावर संशोधनपर लेख सादर करणार आहेत.
डॉ. सावर्डेकर यांनी जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाचणीचे दापोली 2 जी जास्त खनिजे आणि अधिक उत्पादन देणारी जात विकसित केली आहे. त्याचप्रमाणे भाताची क्षार प्रतिकार पनवेल 3, नाचणी, वरी आणि वाली पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी सहभाग नोंदविला आहे. आपल्या 27 वर्षांच्या कालावधीत त्यांनी 102 संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कोलंबो, ढाका आणि देशांतर्गत पार पडलेल्या सेमिनार, कार्यशाळा यामध्ये  सहभाग घेऊन 70 प्रबंध सादर केलेले आहेत. डॉ. सावर्डेकर यांनी 27 पदव्युत्तर आणि 4 आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले असून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील 5 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.