दिल्ली डायरी – ‘आप’ का क्या होगा?

>> नीलेश कुलकर्णी , [email protected]

राजकीय विरोधकांना बदनाम करायचे, विविध प्रकरणांमध्ये अडकवायचे आणि त्यांच्यासह त्यांचा पक्षही उद्ध्वस्त करायचा, अशी ‘चाणक्य नीती’ पेंद्रातील सत्तापक्ष जोरात राबवीत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्याचाच बळी आहेत. मद्य घोटाळ्या प्रकरणी आलेले ईडीचे समन्स केजरीवाल यांनी नाकारले असले तरी दिल्लीच्या राजकारणात पुढे बरेच काही घडू शकते. त्यामुळे ‘आप’ का क्या होगा हा प्रश्न राजधानीतील राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी आलेले ईडीचे समन्स त्यांनी नाकारले, मात्र त्यामुळे आजचे संकट उद्यावर ढकलले गेले इतकेच. केजरीवाल दिल्लीपुरते मर्यादित होते तोवर दिल्लीकरांना त्यांचा धोका नव्हता. मात्र त्यांनी पंजाबही जिंकले. पाठोपाठ हिंदी भाषिक राज्यांच्या पट्टय़ातही हातपाय पसरले. हे दिल्लीकरांना आवडणारे नव्हते. केजरीवालांचा झाडू उद्या आपली साफसफाई करेल, त्यापेक्षा अगोदरच त्यांची ‘झाडाझडती’ केलेली बरी म्हणून सध्या केंद्रीय यंत्रणांना ‘आप’च्या मागे हात धुऊन लागण्यास सांगितले गेले आहे. दिल्लीच्या मद्य घोटाळ्या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर जरूर कारवाई व्हावी. मात्र त्याआडून भाजप जे राजकारण करीत आहे ते घाणेरडे आहे. मनीष सिसोदिया व संजय सिंग या केजरीवालांच्या खासमखास नेत्यांना जेरबंद केल्यानंतर पेंद्रीय यंत्रणांनी केजरीवालांना समन्स पाठविले. त्यावर चौकशीला सामोरे न जाण्याचा ‘अभिषेक बॅनर्जी फॉर्म्युला’ केजरीवालांनी सध्या अवलंबला असला तरी तो काही अंतिम तोडगा नाही.

लोकसभेसाठी इंच इंच लढू अशी वेळ स्वतःला जगातल्या सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱया भारतीय जनता पक्षावर आली आहे. त्यामुळे बहुमताच्या हिशेबात जे आडवे येतील त्यांचा हिशेब तपास यंत्रणांच्या काठीने करायचा, असा हिशेबही भाजपश्रेष्ठाRचा आहे. त्यामुळेच दिल्ली व पंजाबच्या लोकसभा जागांची संख्या लक्षात घेऊन केजरीवालांना धोपटण्याचे काम सुरू आहे. पाणी, वीज, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांत अरविंद केजरीवाल यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. दिल्लीत त्यांचे सगळे पंख कापूनदेखील दिल्लीकरांनी त्यांच्यावर आजवर विश्वास दाखविला आहे. अमित शहांसारखे वजनदार नेते प्रचारासाठी दिल्लीच्या गल्लीबोळात हिंडूनही मतदारांनी केजरीवालांच्या पारडय़ात मते टाकली. त्याचे कारण म्हणजे त्यांची कामे. मात्र आता केजरीवाल हे आयुष्याच्या निर्णायक टप्प्यावर आहेत. सिसोदियांचा वाढलेला तुरुंगवास, त्यानंतर संजय सिंग यांची तुरंगात झालेली रवानगी. त्यामुळे मद्य घोटाळ्याबाबत सामान्य दिल्लीकरांना संशयाचा वास येऊ लागला आहे. भाजप तसे नरेटिव्ह रचत आहे हा राजकारणाचा भाग झाला. मात्र तरीही ‘आप’च्या विश्वासार्हतेला तडे जाऊ लागले आहेत. हे तडे केजरीवालांसाठी धोकादायक आहेत. अरविंद केजरीवाल यांना आज ना उद्या अटक होऊ शकते या मानसिकतेत ‘आप’ आहे. त्यामुळेच भावी मुख्यमंत्रीपदासाठीही मोर्चेबांधणी सुरू आहे. गोपाल राय, अतिशी व रामनिवास गोयल ही नावे त्यासाठी चर्चेत आहेत. केजरीवालांनी ज्या उदात्त भावनेपोटी पक्ष निर्माण केला, ‘सिस्टीम’ बदलण्याची भाषा केली, तोच पक्ष मद्य घोटाळ्यात अडकला तर जनतेचा राजकारण्यांवरचा उरलासुरला विश्वासही उडून जाईल. केजरीवाल बदनाम होऊन संपावेत अशी रणनीती यामागे भाजपची आहे.

काँग्रेसचे ‘सॉफ्ट हिंदुत्व’

भाजपच्या तथाकथित हिंदुत्ववादी राजकारणाची काsंडी करण्यात सध्या मध्य प्रदेशात कमलनाथ व राजस्थानात अशोक गेहलोत यांना यश मिळताना दिसत आहे. कमलनाथांनी तर निवडणूक प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वीच बागेश्वर धामचा कार्यक्रम आयोजित करत भाजपच्या हिंदुत्वातली हवा काढून टाकली होती. त्यात राजस्थानात भाजपच्या फायरब्रँड नेत्या समजल्या जाणाऱया साध्वी आनंदी यांच्या हातात काँग्रेसचा ‘हात’ देत अशोक गेहलोतांनी खऱया अर्थाने ‘जादू’ केली आहे. त्यांना ‘जादूगार’ म्हणतात ते काही उगीच नाही! साध्वी आनंदी यांना राजस्थानात ‘लेडी योगी’ नावाने ओळखले जाते. त्यांची मुस्लिमविरोधी भाषणेही खूप गाजली होती. मात्र तरीही मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असलेल्या राज्यात गेहलोतांनी ही खेळी का केली, यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. वास्तविक नुसत्या तुष्टीकरणावर या वेळी राजस्थानची लढाई जिंकता येणार नाही याची पूर्ण कल्पना राजकारणातले जादूगार असलेल्या गेहलोतांना आहे. भाजपने वसुंधराराजेंना अडगळीत टाकलेले असताना भाजपच्याच भात्यातील प्रखर हिंदुत्वाचा चेहरा काँग्रेसच्या गोटात घेऊन गेहलोत यांनी मोठा धोबीपछाड टाकला आहे. राजस्थानात भाजप विरुद्ध काँंग्रेस हा सरळ मुकाबला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक सुमदायाला काँग्रेसला कौल देण्याशिवाय पर्याय नाही. शिवाय साध्वी आनंदी यांच्यामुळे काँग्रेसच्या मतपेढीत सॉफ्ट हिंदुत्वाची बेगमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे गेहलोत खुशीत आहेत. साध्वींचा काँग्रेस प्रवेश काँग्रेससाठी आनंदी आनंद ठरतो का ते दिसेलच!

‘एथिक्स’ कुठे आहेत?

तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोएत्रा यांची सध्या संसदेच्या ‘एथिक्स कमिटी’कडून कसून वगैरे चौकशी सुरू आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या गंभीर आरोपाची छाननी सुरू आहे. त्यात महुआ यांनी पैसे घेतल्याचे अजून तरी उघड झालेले नसले तरी तरी त्यांनी त्यांच्या ‘कवच’ या अॅपचा पासवर्ड कुणाला तरी दिला होता व त्यातून 47 वेळा लॉग इन झाल्याचे उघड झाले आहे. ‘कवच’चा पासवर्ड शक्यतो खासदार आपल्या पीए मंडळींकडे देत असतात. तोही फार मोठा गुन्हा नाही. मात्र तरीही त्यामुळे ‘राष्ट्रीय सुरक्षे’ला धोका निर्माण झाल्याचे कमिटीचे म्हणणे आहे. तेही मान्य केले तरी या कमिटीने महुआ यांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित सवाल जवाब केल्यामुळे रागाने महुआ यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपचे खासदार विनोद सोनकर यांच्या अध्यक्षतेखाली ही एथिक्स कमिटी अस्तित्वात आली आहे. चौकशीवेळी महुआ यांना ‘तुम्ही रात्रभर तासन्तास कोणाशी बोलता, काय बोलता’, असे व्यक्तिगत प्रश्न विचारले गेले. त्यामुळे साहजिकच महुआ यांच्या रागाचा पारा चढला. महुआ यांचे पूर्वाश्रमीचे मित्र जय अनंत यांना ‘प्यादे’ बनवून महुआ मोएत्रांचा राजकीय काटा काढण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत. अदानी प्रकरणात आवाज उठविल्याची किंमत महुआ मोएत्रा मोजत आहेत. मात्र त्याच वेळी त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा अधिकार कोणत्याही एथिक्स कमिटीला नाही आणि हे ‘एथिक्स’ला धरून नाही हे समजून घ्यायला हवे.