पाच वर्षांच्या मुलाची साक्ष निर्णायक, पत्नीच्या हत्येप्रकरणी दंतवैद्याला जन्मठेप

पाच वर्षांच्या मुलासमोरच पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दंतवैद्याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खटल्यात पाच वर्षांच्या मुलाची साक्ष निर्णायक ठरली. त्याची साक्ष विचारात घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी आरोपी उमेश बोबळेला दोषी ठरवले.

दादरमध्ये 2016 मध्ये हत्या झाली होती. घटनेच्या काही महिने आधी आरोपी उमेश व त्याची पत्नी तनुजाने घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. नंतर पोटगीच्या मागणीवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातूनच उमेशने मुलासमोरच पत्नीवर घरातील चाकूने तब्बल 34 वार केले. त्यात गंभीर दुखापत होऊन तनुजाचा मृत्यू झाला. उमेश हा तनुजाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तनुजा गरोदर होती, त्यावेळी त्याने डीएनए टेस्टसाठी आग्रह धरला होता. पोटातील बाळ आपलेच असल्याचे सिद्ध करून घेण्यासाठी डीएनए टेस्टसाठी तनुजावर सक्ती केली होती, असा जबाब साक्षीदारांनी नोंदवला. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील रामनाथ किणी यांनी आरोपीच्या पाच वर्षांच्या मुलासह शेजारी, तपास अधिकारी आदी 10 साक्षीदार तपासले.