अदानीविरोधात 50 हजार धारावीकर आज रस्त्यावर उतरणार

झोपडीधारकांना विश्वासात न घेता पुनर्विकासासाठी लादलेल्या घोटाळेबाज अदानीविरोधात धारावीकर एकवटले असून उद्या बुधवार, 9 ऑगस्टला क्रांतिदिनी 50 हजार धारावीकर ‘अदानी चले जाव, धारावी बचाव’चा नारा देणार आहेत. शिवसेनेसह 12 राजकीय पक्ष उद्या संध्याकाळी 5 वाजता एन. शिवराज मैदानात होणाऱया सभेला उपस्थित राहणार आहेत. आमचा पुनर्विकासाला विरोध नाही तर घोटाळेबाज अदानीला विरोध आहे, अशी भूमिका धारावीकरांनी घेतली आहे.

मिंधे सरकारकडून होणाऱया धारावीच्या पुनर्विकासाला शिवसेनेसह 12 राजकीय पक्ष, स्वयंसेवा संस्था, 200 संघटना आणि विविध मंडळांनी जोरदार विरोध केला आहे. विभागप्रमुख महेश सावंत, माजी आमदार बाबूराव माने, धारावी संघटक विठ्ठल पवार, उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

आराखडाही नाही, नव्याने सर्वेक्षण नाही

राज्य सरकारने अदानीची विकासक म्हणून नेमणूक केली आहे, मात्र लोकांना अदानीबद्दल विश्वास नाही. प्रकल्पाचा कोणताही आराखडा तयार नाही. सरकारने नव्याने सर्वेक्षण केलेले नाही. धारावीत 1 लाख 15 हजार झोपडय़ा आहेत. मात्र, 1995 च्या सर्वेक्षणानुसार सरकार फक्त 58 हजार झोपडीधारकांचा पुनर्विकास करणार म्हणते. मग बाकीच्यांनी जायचे कुठे, असा सवाल करत धारावीचा विकास सिडको, म्हाडाही करू शकते असे धारावी बचाव आंदोलनाचे सदस्य बाबूराव माने यांनी सांगितले.