लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले ? सगळ्यांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी

अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आंदोललकांवर लाठीहल्ला कोणाच्या आदेशावरून करण्यात आला होता ? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे. मिंधे-भाजप सरकारच्या आदेशावरूनच हा हल्ला करण्यात आला होता असा आरोप केला जात आहे. वरून आदेश असल्याशिवाय पोलीस हा लाठीहल्ला करू शकत नाही असे बोलले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बोलताना म्हटले होते की जर आमच्या तिघांपैकी कोणी आदेश दिले असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकारणातून बाजूला होईन. त्यांनी दिलेल्या या आव्हानाबाबत बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सगळ्यांची नार्को टेस्ट करा असे म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी म्हटले की, “सगळ्यांची नार्को टेस्ट करा. अधीक्षकांना आदेश कोणी दिला? एसपींनी कोणाला आदेश दिला? एसपी गुजराती असल्याने त्याला सुट्टी आणि तिथला डीवायएसपी ओबीसी आहे म्हणून त्याला निलंबिक केलं. गृहमंत्री म्हणतात की एसपीला अधिकार असतो मग डीवायएसपी निलंबित का ? दूध का दूध पानी का पानी नार्को टेस्टनंतर कळेल”

प्रकरण काय आहे ?
मराठा समाजाला आरक्षण या मागणीसाठी अंरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. 1 सप्टेंबरला पोलिसांनी मोठा फौजफाटा घेऊन जरांगे पाटील यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. पण याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आणि पोलिसांना धक्काबुक्की झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता होता. लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत पक्षपातीपणा का करण्यात आला असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.