देखणा कोरीगड

डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

सह्याद्रीत असे अनेक किल्ले आहेत की, जे इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात आपणास जास्त भावतात. याच पंक्तीतील एक किल्ला लोणावळ्याच्या पूर्वेकडील कोरबारस मावळात आहे. हा देखणा किल्ला म्हणजे किल्ले कोरीगड होय.

कोरीगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे-लोणावळा-अँबी व्हॅलीमार्गे गडपायथ्याचे पेठ शहापूर गाव गाठावे लागते. या पेठ शहापूर गावाच्या बाजूलाच किल्ले कोरीगड एखाद्या अजस्र जहाजासारखा दक्षिणोत्तर पसरलेला आहे.  पायऱयांनी वर गेलो असता गडाच्या मध्यात उजवीकडे एक कातळकोरीव गुहा दिसून येते. छोटय़ाशा गुहेत पाण्याचे टाके आहे. पुढे गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच डावीकडे एक छोटी देवडी आहे. ती पाहून आपण ऐन किल्ल्यात प्रवेश करतो. गडमाथ्यावर विस्तीर्ण पठार आहे. गडाच्या मध्यभागी पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. तलावाच्या काठावरच महादेवाचे एक छोटेखानी मंदिर आहे. मंदिरासमोर तोफगाडय़ांवर चार तोफा मांडलेल्या आपणास दिसून येतात. पुढे एका उंचवटय़ावर गणपतीचे मंदिर आहे. जवळच गडाची अधिष्ठाता असलेल्या कोराई देवीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. कोराई देवीच्या मंदिरासमोर एक दगडी दीपमाळ व वीरगळ आहे. या मंदिराच्या मागे लोखंडी स्टँडवर ‘लक्ष्मी’ नावाची भलीमोठी तोफ ठेवलेली आहे. येथून पुढे दक्षिणेकडे तटाच्या कडेने पायऱयांनी खाली उतरल्यावर आपण गडाच्या आजही सुस्थितीत असलेल्या दुसऱया प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. या प्रवेशद्वारातून गडपायथ्याच्या आंबवणे गावात उतरता येते. वाटेत आपणास अजून एक तोफ दिसून येते. या बाजूला शिवकालीन चिलखती बुरूज आहे. पुढे पश्चिमेच्या कडय़ाजवळ तटबंदीच्या आतील भागात तीन लेणीवजा खांबटाकी लागतात. या बुरुजावरून संपूर्ण कोरीगडाचे  दर्शन होते. अशा रीतीने आपली गडफेरी पूर्ण होते.

कोरीगड हे निश्चितच एक दुर्गनवल आहे.  दुर्गस्थापत्यकारांनी चोहोबाजूंनी तटबंदी बुरुजाचे शेलापागोटे चढवून एवढे देखणेपण बहाल केलेय की, हा गड नजरेत भरल्याशिवाय राहत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महत्त्वपूर्ण किल्ला

 शिवपूर्वकाळात या गडावर कोळी राजे राज्य करत होते. इसवी सन 1490 च्या सुमारास हा गड निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामशाहीच्या अस्तानंतर 1636 सुमारास गडावर आदिलशाही अंमल सुरू झाला. आदिलशहातर्फे ढमाले देशमुखांचा ताबा या गडावर होता. पुढे 1647 मध्ये किंवा त्यापूर्वी दादोजी कोंडदेव यांनी राजकारण करून ढमाले देशमुखांकडून हा गड ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी कोरीगड हा महत्त्वपूर्ण किल्ला असल्याने इसवी सन 1665 रोजी मिर्झाराजे जयसिंगसोबत झालेल्या पुरंदरच्या तहानुसार हा गड स्वराज्यातच राहिला. 1671-72 मध्ये कोरीगडाची डागडुजी करण्यासाठी महाराजांनी 3000 होनाची तरतूद केली. मार्च 1818 मध्ये इंग्रज अधिकारी लेफ्टनंट रेमन, कर्नल प्रॉथर, मेजर हॉल यांनी कोरीगडावर तोफांचा मारा सुरू केला. गडावरील 700 सैनिक व त्यांचा मुख्य जानोबाभाऊ यांना इंग्रजांनी कैद केले.