मिंध्यांच्या डोक्याला शॉट; गोडसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीच्या प्रमुख पक्षांमध्येच धुसफुस सुरू झाली आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा मिंधे गटाकडून करण्यात आल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याचा हट्ट धरल्याने अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता असून याचा मोठा फटका कल्याण लोकसभा मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. शिर्डीत सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षातूनच राजीनामा सत्र सुरू झाल्याने मिंध्यांच्या डोक्याला चांगलाच शॉट बसला आहे.

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेल्यांना विद्यमान खासदारांच्या जागा आणि त्यांना पुन्हा तिकीट मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप नेत्यांपुढे लोटांगण घालावे लागत आहे. हेमंत गोडसे यांना परत उमेदवारी देण्यात येऊ नये, असे भाजपच्या नेत्यांनी बजावलेले असतानाही मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये झालेल्या मिंधे गटाच्या मेळाव्यात गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यामुळे स्थानिक भाजप नेते चांगलेच दुखावले आहेत.

गोडसेंच्या उमेदवारीला भाजपाचे स्थानिक पदाधिकारी दिनकर पाटील यांनी विरोध केला आहे. जागावाटप होईल, पक्षश्रेष्ठाr निर्णय घेतील, त्यानंतर तो जाहीर होईल. तो निर्णय अंतिम असतो. त्यामुळे काल जे काही झालं, ते जनतेला मान्य नसल्याच म्हटले आहे.

लोखडेंच्या विरोधात स्थानिकांचे बंड
शिर्डी लोकसभेची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे रामदास आठवले येथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मिंधे गटाचे विद्यमान खासदार लोखंडे यांच्याविरोधात पदाधिकारी नाराज असल्याचे समोर आले आहे. मतदारसंघातील मिंधे गटाच्या अनेक पदाधिकाऱयांनी राजीनामे दिले असून ‘शिर्डीत आपलाच उमेदवार पाहिजे; पण लोखंडे नको,’ असा इशारा पदाधिकाऱयांनी बैठकीत दिल्याने मिंध्यांची डोकेदुखी वाढली आहे.

विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर शेकडो एकर जमीन लाटल्याचा आरोप आज पुन्हा केला. ‘नमो विचारमंच’ या नावाखाली बारामतीतून निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहोत, असे शिवतारे म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी बारामती लोकसभेतील पदाधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावली आहे.