शिंदे चक्रव्यूहात, शिवसेना संपवण्याचे भाजपचे कारस्थान; मिंधे गटाला झाला साक्षात्कार

लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये तीन तिघाडा अन् काम बिघाडा सुरू आहे. मिंधे गटातील अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला असून काहींवर टांगती तलवार आहे. जागावाटपावरून खदखद सुरू असतानाच शिवसेना संपवण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचा साक्षात्कार मिंधे गटाला झाला आहे. शिवसेना फोडून सत्तेच्या हव्यासापोटी भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसलेल्या मिंधे गटाला नव्याचे नऊ दिवस संपल्याची जाणीव झाली आहे.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने चक्रव्यूहात अडकवले आहे. शिंदेंचा अभिमन्यू झाला आहे. भाजपकडून शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत, असा गंभीर आरोप मिंधे गटाचे नेते सुरेश नवले यांनी केला. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा आरोप केला असून यामुळे महायुतीतील खदखद बाहेर आली आहे.

भाजपने कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी दिला. भाजपच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचा बळी जात असून हे शोभादायक नाही. सामान्य शिवसैनिकांचे सोडा विद्यमान खासदारांनाही आपली खासदारकी मिळवला आलेली नाही. हे दुर्दैवी असून मित्र पक्षाचे उमेदवार सांभाळण्याची, पोसण्याची जबाबदारी आमच्यावर दिल्याचे चित्र असल्याची खंत नवले यांनी व्यक्त केली.

परभणीची जागा रासपाला सोडण्यात आली. नाशिकची जागा शिवसेनेची आहे, पण ती अजित पवार गटाला सोडण्याची खात्री आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागाही भाजपला सोडली आहे. लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी भारतीय जनता पक्ष ड्राम करतो. शिवसेनेचा बळी देणे आणि शिवसेना संपवण्याचे कारस्थान भाजप करत आहे. सर्व्हेच्या आडून उमेदवारी नाकारली जात आहे, असा आरोपही नवले यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ते पुढे म्हणाले की, लोकसभेला सर्व्हेच्या आडून जागा नाकारण्यात आल्या. उद्या विधानसभेची निवडणूक लागेल. त्यावेळी आयबीचा अहवाल, सीबीआय चौकशीच्या बहाण्याने तिकीट नाकारले जाईल. 40 पैकी 30 आमदारांना तिकीट नाकारले तर काय स्थिती होईल हा विचार करूनही अंगावर काटा येतो. 48 जागांसाठी भाजप असे करत असेल तर 288 जागांसाठी काय करेल? असा सवालही नवले यांनी केला. तसेच तहाच्या बोलणीमध्ये भाजपकडून फसवणूक केली जात असून मुख्यमंत्र्यांच्या स्थिती महाभारतात चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. याला भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.