राष्ट्रवादीत धाकधूक, शिंदे गट आणि भाजपात अस्वस्थता

महाराष्ट्रात शिवसेनेशी गद्दारी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाच्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईचे प्रकरण प्रलंबित आहे. त्यातच भाजपच्या डर्टी पॉलिटिक्सला बळी पडून अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकवले खरे, पण त्यांची साथ देणाऱया आमदारांची अपात्रतेच्या कारवाईच्या भीतीने धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी सत्तेत आल्याने गेले वर्षभर मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गट आणि भाजप आमदारांचीही अस्वस्थता वाढली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने विधिमंडळात पक्षप्रतोद नियुक्ती करण्याचे अधिकार पक्षाच्या अध्यक्षांना असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अवलोकन केल्यास बंडखोरी करणारे आमदार अपात्रतेच्या कारवाईस निश्चित पात्र ठरतात. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करत अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणाऱयांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. तसेच मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे पत्रच प्रदेशाध्यक्षांच्या सहीने राष्ट्रवादीने जारी केले आहे. त्यामुळे अजितदादांच्या सोबत गेलेल्या आमदारांची धास्ती वाढली आहे.

गोगावलेंची पंचाईत

महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासारख्यांची दुहेरी पंचाईत झाली आहे. त्यांना मंत्रीपद तर मिळालं नाहीच, उलट राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्याने त्यांचा हिरमोड झालाय.

कांदेंची डोकेदुखी वाढली

नाशिकमध्ये भुजबळांच्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेसोबत गद्दारी करून आमदार सुहास कांदे शिंदेंसोबत आले. आता भुजबळ मंत्री झाल्याने कांदेंची डोकेदुखी वाढलीय.

राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याची वेळ

शिंदे गटातील बहुसंख्य आमदार गेल्या वेळी राष्ट्रवादीला हरवून विजयी झाले होते. आता भविष्यात तिकीटवाटपात राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

मंत्रीपदासाठी इच्छुकांची कोंडी

राष्ट्रवादीच्या सरकारमधील एण्ट्रीमुळे शिंदे गट आणि भाजपमधून मंत्रीपदासाठी इच्छुकांची भलतीच काsंडी झालीय. राष्ट्रवादीला मंत्रीपदे द्यावी लागल्याने दोघांचाही सत्तेतला वाटा आपसूकच कमी झालाय.

धर्मरावबाबांमुळे गडचिरोलीत भाजपची डोकेदुखी वाढली

राष्ट्रवादीच्या धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने गडचिरोलात भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. धर्मरावबाबांनी येणारी लोकसभा लढविणार असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यमान भाजपचे खासदार अशोक नेते यांची चिंता वाढली आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मरावबाबांच्या कन्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. यामुळे भाजपकडून येथून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी राज्यमंत्री अम्ब्रीश आत्राम यांची उमेदवारीदेखील धोक्यात आली आहे.

मुश्रीफांमुळे समरजित घाडगेंचे भवितव्य धोक्यात

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपच्या समरजित घाडगे यांच्यातील वैर सर्वांनाच ठाऊक आहे. त्याच मुश्रीफ यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्याने घाडगेंचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. कागल मतदारसंघातून लढण्याची जोरदार तयारी समरजित घाडगे यांनी केली होती. ज्यांच्याविरुद्ध आतापर्यंत मतदारसंघात रान उठवले तेच मुश्रीफ सरकारमध्ये सहभागी झाल्याने आता काय करायचे, असा प्रश्न घाडगे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

दोघांत तिसरा आल्याने मिंधे गटात चलबिचल

दोघांत तिसरा आल्याने मिंधे गटात चलबिचल सुरू झाली आहे. ठाणे येथे आज झालेल्या कार्यक्रमानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली. सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ज्येष्ठतेनुसार बहुतेक महत्त्वाची खाती मिळतील. ते त्यांच्या कार्यकर्त्यांची बाजू घेतील आणि निधीचा वापर करतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नसल्याने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यावेळीही राष्ट्रवादीकडून तशीच वागणूक मिळाली तर काय करायचे. आम्हाला पुन्हा निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागेल, अशी चिंता शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.