मिंधे गटाचे ‘स्टार’ फिरले, स्टार प्रचारकांच्या यादीतून मोदी-शहा फडणवीसांची नावे हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश

जाहीर सभेत, बैठकीत, कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करत प्रत्येक कार्यक्रमाचा श्रीगणेशा करणाऱया मिंधे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोर का झटका दिला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतून पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची नावे हटविण्यात यावी असे आदेश निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.

निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत स्वतःच्या पक्षाशिवाय अन्य पक्षातील नेत्यांचा समावेश करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही भाजप नेत्यांचा समावेश शिंदे गटाला तर भाजपला शिंदे आणि अजित पवार गटांतील सदस्यांचा समावेश करता येणार नाही, असा आदेश आयोगाने दिला आहे.

शिंदे गट आणि भाजप यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीच्या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्यावतीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत चुका केल्या आहेत. त्यांनी यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची नावे दिली आहे. त्याचप्रमाणे भाजपने त्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे दिली आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीचा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील व्यक्तींची नावे प्रसिध्द केली आहेत जी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77चे उल्लंघन करणारी असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

निवडणूक आयोगाने काय म्हटले आहे

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तक्रारीचे उत्तर पाठवले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या नावांचा व त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक पदांचा उल्लेख करत मिंधे गटाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम 77चे उल्लंघन केले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांची नावे द्यावीत. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही मिंधे गटातील व अजित पवार गटांतील सदस्यांची नावे आहेत तसेच भाजपने लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम 77 अंतर्गत स्टार प्रचारकांची कोणतीही यादी निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची नोंद नाही, असे पत्रात म्हटले आहे.