मोदींची कानउघाडणी करा! शरद पवार यांच्याकडे काँग्रेसची मागणी

पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला जावे की नाही हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा प्रश्न आहे. ते कार्यक्रमाला जातच आहेत तर ज्या मोदी यांनी शरद पवार आपले गुरू आहेत, त्यांचे बोट धरून राजकारणात आलो, असे म्हटले होते. आता गुरू-शिष्य एकत्र येतच आहेत तर, नरेंद्र मोदी जे काही करत आहेत ते लोकमान्य टिळकांच्या विचारसणीच्या विरोधात आहे, अशी कानउघाडणी गुरू शरद पवार यांनी शिष्य नरेंद्र मोदींची करावी, ही आमची अपेक्षा आहे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

देशभरात भाजपा व नरेंद्र मोदी विरोधात इंडिया नावाने आघाडी स्थापन झालेली असताना या आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे की नाही हा प्रश्न चर्चिला जात आहे. याबाबत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ज्या व्यक्तीमुळे देशाची लोकशाही, संविधान, शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला धोका पोहचलेला आहे, त्यांच्या कार्यक्रमाला पवार यांनी उपस्थित राहू नये अशी लोकांची इच्छा आहे.

पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ नये, ही जनभावना – संजय राऊत

शरद पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ नये, ही महाराष्ट्राची आणि जनतेची भावना आहे. लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे. ज्या प्रकारचे राजकारण गेल्या दिवसांपासून सुरू आहे, ते लोकांना मान्य नाही. अशा राजकारणाचे कर्तेधर्ते यांना कोणता पुरस्कार दिला जातो. याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. पण मविआ नेते अशा ठिकाणी जातात. तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतात, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा – वर्षा गायकवाड

महाविकास आघाडी म्हणून आपण पंतप्रधान मोदी आणि मणिपूर घटनेविरोधात सर्वसामान्यांमध्ये जातोय. त्यांचा निषेध करतोय. त्यामुळे त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येणे कितपत योग्य आहे? शरद पवार यांनी मोदींसोबत व्यासपीठावर एकत्र येण्यावर विचार करावा, असे मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या.