इतिहासात संताजी आणि धनाजींना घाबरायचे; आताचे राज्यकर्ते आम्हाला घाबरतात

इतिहास आपण वाचला आहे. काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संताजी आणि धनाजी पाण्यात दिसत असत. संताजी आणि धनाजींना लोक घाबरायचे. आत्ताचे राज्यकर्ते आम्हाला घाबरतात, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

सांगोला येथे दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डॉ. अनिकेत देशमुख युवा मंचच्या वतीने आयोजित कृषी महत्त्वाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आहेत. ते माझ्यावर टीका करतील हे मला ठावूक आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीतही मोदींनी तेच केले. शिर्डीत साईबाबा मंदिरात दर्शन घेतले आणि भाषणात म्हणाले, शरद पवारांनी देशासाठी काय केले? तुम्ही दर्शन घ्यायला आला आहात तर घ्या, उगाच चुकीच्या गोष्टी कशाला बोलता? असा सवाल शरद पवार यांनी केला. इतिहासात आपण वाचले आहे की, काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संताजी आणि धनाजी पाण्यात दिसत असत. आपल्या राज्यकर्त्यांना तशाच प्रकारची चिंता आमच्याबद्दल वाटते. त्यामुळे ते अशी विधाने करतात, असा टोला पवार यांनी लगावला.