मॅच फिक्सिंग! काँग्रेसला बाद करून भाजपने सुरत लुटली!! लोकसभेच्या लढाईत गुजरातमध्ये लोकशाहीवर दिवसाढवळ्या दरोडा

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा निवडणूक अर्ज बाद करण्यात आला. त्यापाठोपाठ निवडणुकीत उभ्या असणाऱया उर्वरित आठही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली. हे एक प्रकारचे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप कॉँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान सुरतमध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे लोकसभेच्या लढाईत लोकशाहीवर दिवसाढवळय़ा दरोडा टाकून भाजपने सुरत लुटली अशी टीका सर्वत्र होत आहे.

सुरत लोकसभेचे कॉँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या निवडणूक अर्जावर करण्यात आलेल्या तीन सूचकांच्या सह्या बोगस असल्याचा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला होता. यानंतर उमेदवारी अर्जावर सह्या असलेल्या प्रस्तावकांना निवडणूक निर्णय अधिकाऱयांसमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. कॉँग्रेस उमेदवार कुंभानी हे त्यांना प्रत्यक्षात हजर करू शकले नाहीत. यामुळे कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्जही याच कारणास्तव अवैध ठरविण्यात आला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप वगळता उर्वरित सर्व उमेदवारांनी अचानकपणे एकामागून एक आपले अर्ज मागे घेतले. ही एकप्रकारे भाजपची मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप कॉँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.

नेमके काय घडले?

– काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या अर्जावर त्यांचा भाचा ध्रुविन धामेलिया, मेहुणा जगदीश सावलिया आणि व्यावसायिक भागीदार रमेश पोलरा अशा तीन जणांच्या सूचक म्हणून सह्या होत्या.
– भाजपने या तिघांच्या सह्या बोगस असल्याची तक्रार केली होती. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी सह्या करणाऱया तिघांनाही रविवारी आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते.
– उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही असलेल्या तिघांनीही या सह्या आपल्या नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. दरम्यान हे तिघेही सूचक गायब झाले आहेत.

काँग्रेसच्या सूचकांचे अपहरण झाल्याचा दावा

काँग्रेसचे उमेदवार कुंभानी यांच्या निवडणूक यांच्या अर्जावर सूचक म्हणून सह्या केलेल्या तिघांचेही अपहरण करण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे स्थानिक नेते बाबू मंगुकिया यांनी केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी अर्जांवर त्यांनी सह्या केल्या आहेत की नाही, याऐवजी त्यांच्या अपहरणाची चौकशी करायला हवी, असे मंगुकिया यांनी म्हटले आहे.

सुरत मतदारसंघात घडलेल्या घडामोडी पाहता येथील लोकसभा निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेसने आज लेखी निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस नेते अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले.

नीलेश कुंभानी यांच्या अर्जावर सूचक म्हणून सह्या करणाऱया तिघांनी आपल्यावर दबाव असल्याचे म्हटले आहे. तसेच ते तिघेही सध्या बेपत्ता असून त्यांचे अपहरण झाले असण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली. हे प्रकरण आयोगाने गांभीर्याने घ्यावे असे ते म्हणाले.

हुकूमशहाची खरी सूरत देशासमोर

हुकूमशहाची खरी सूरत पुन्हा एकदा देशासमोर आली आहे. जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, ही केवळ सरकार स्थापन करण्याची निवडणूक नाही, ही निवडणूक देश वाचवण्याची, संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे, असे कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सुरतचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी कुंभानी यांचा अर्ज रद्द केला. तसेच कॉँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाल यांचा अर्जही अवैध ठरवत कॉँग्रेसकडून दाखल केलेले दोन्ही अर्ज बाद केले व आज मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित केले.