मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी शब्द; शिवसेनेचा फेरविचार अर्ज आयोगाने फेटाळला

मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिले होते. त्यावर शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे अर्ज करून या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. पण शिवसेनेचा हा अर्ज निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र व सनियंत्रण समितीने फेटाळला आहे. दरम्यान, त्याविरोधात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे दाद मागण्याचा पर्याय शिवसेनेकडे आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे दोन्ही शब्द मशाल गीतातून वगळणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बजरंगबली व प्रभू श्रीरामाच्या नावावर मते मागतात ते चालते का? आधी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. हुकुमशाहीसमोर शिवसेना झुकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.