उन्हाचा चटका अन् त्यात नगरमध्ये मोदींची सभा; वाढत्या तापमानामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी नगर मध्ये येत आहे. आता ऐन उन्हाळ्यात तापमान वाढले असताना दुपारी भर उन्हात सभा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात तापमानात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये,योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा पोलीस विभागाने या सभेसाठी दोन किलोमीटरवर वाहन व्यवस्था करण्याचे आदेश दिले असल्याने नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल करण्यात येत आहे.

आठवड्याभरापासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. राज्यात सर्वाधिक तापमान हे सोलापूर जिल्ह्यामध्ये 44 अंश नोंदवले गेले आहे. अनेक ठिकाणी मंगळवारी मतदान होणार आहे. तसेच नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. त्यातच आता राज्यात तापमान वाढल्याने जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने जनतेने खबरदारी घ्यावी, या प्रकारची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा पोलीस विभागाने सभेच्या ठिकाणी येताना वाहन व्यवस्था दोन किलोमीटर लांबच्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे सभेला येणाऱ्यांचे हाल होणार आहेत.

ही सभा सुजय विखे यांच्या कार्यालयाकडून ऐन उन्हात दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा येणार हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे आन उन्हात नागरिकांना ताटकळथ बसावे लागणार आहे. जिल्हा प्रशासन दुपारी घराबाहेर पडू नका, असा सल्ला देत असताना त्या वेळेत सभा घ्यायची कशासाठी, असा सवाल करण्यात येत आहे. या सभेमुळे उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने उष्णतेची तीव्रता पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, भाजपकडून ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात सभा ठेवण्यात आली आहे, त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.