मी आणखी जोमानं काम करणार, मग वय 82 असो की 92! शरद पवारांच्या विधानानं सत्ताधाऱ्यांना धडकी

राज्यातील अभूतपूर्व अशा गोंधळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी शरद पवार यांनी सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली.

अजित पवार यांनी संपूर्ण पक्षावर दावा करत आपणच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा बुधवारी केला होता. त्यावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, कुणी काय म्हटलं ते मला माहित नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे. दुसरं कुणी आपलं नाव सांगून काही बोलत असेल तर ते बोलू शकतात. पण त्यात काही सत्य नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांनी आपल्या वयाची आठवण करून दिल्याच्या प्रश्नावर शरद पवार यांनी तात्काळ उत्तर दिलं की, ‘आता मी आणखी जोमानं काम करणार, मग वय 82 असो की 92. शरद पवार यांच्या या विधानानं त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना धडकी भरवली आहे.’

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांच्या संख्येला महत्त्व नाही. पक्षाचे धोरण आणि घटना महत्त्वाची असल्याचे त्यात नमूद केले आहे. कोणाल पंतप्रधान बनायचे असेल, कोणाला मुख्यमंत्री बनायचे असेल, त्या त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असेही पवार म्हणाले. अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांना पद मिळाले नाही, त्यामुळे त्यांची नाराजी असावी, असे आपल्याला वाटत नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. आम्ही आमची बाजू आणि म्हणणे निवडणूक आयोगासमोर मांडू, तिथे न्याय मिळाला नाही, असे वाटले तर योग्य त्या ठिकाणी आमचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल. मात्र, ती वेळ पक्षावर येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी कितीही आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला तरी त्यातील तथ्य आणि सत्यता पडताळून निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल, असेही पवार यांनी सांगितले. आपला जनतेवर विश्वास जनता आपल्याला पाठिंबा देईल. जनतेचे समर्थन असेल तर पक्ष बळकट होतोच. याचा आपल्याला अनुभव असल्याचेही ते म्हणाले. आपल्याला तरुण पिढी आणि जनतेचे समर्थन मिळत आहे, याचे आपल्याला समाधान असल्याचेही ते म्हणाले.

भाजप सरकारकडून विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांचा गेरवापर करण्यात येत आहे. भाजपला याची किंमत चुकवावी लागेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यात नक्कीच बदल दिसून येईल, असेही ते म्हणाले. राज्यातबी बदल दिसून येणार आहे. भाजपचे राजकारण जनता बघत आहे. ते सत्तेसाठी काहीही करत आहेत. त्यामुळे जनता त्यांनी पुन्हा संधी देणार नाही. महाविकास आघाडी कत्र असून जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.