…म्हणूनच बंगळुरू आयपीएल विजेतेपदाविना, अंबाती रायुडूची टीका

दिग्गज खेळाडू दबावाखाली खेळताना अपयशी ठरत असल्यामुळे बंगळुरूसारख्या तगडय़ा संघाला एकही आयपीएल स्पर्धा जिंकता आली नसल्याची टीका माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने केली. अंबातीने नाव न घेता विराट कोहली, फाफ डय़ु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दिग्गजांवर आपल्या टीकेचे बाण सोडले. या आयपीएलमध्ये बंगळुरू चार सामने खेळला असून त्यापैकी तीन सामन्यांत पराभूत झाला आहे.

बंगळुरूचे गोलंदाज नेहमीच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर धावांचा वर्षाव करतात आणि त्यांचे फलंदाज एकत्रितपणे सांघिक कामगिरी करण्यात नेहमी अपयशी ठरतात. संघावर दबाव आणि दडपण असताना कोण फलंदाजी करतो तर तो म्हणजे दिनेश कार्तिक… आणि या संघात असलेले दिग्गज दबाव न झेलताच डग आऊटमध्ये विराजमान झालेले असतात. सोळा वर्षे झाली, ते एकदाही विजेतेपदाचा सोहळा साजरे करू शकले नाहीत. जेव्हा जेव्हा संघ दबावाखाली असतो तेव्हा त्यांचा एकही रथी-महारथी संघाच्या मदतीसाठी नसतो. त्यांचे सर्व युवा फलंदाज तळाला येऊन झुंज देत असतात आणि दिग्गज आघाडीला खेळतात. हेच त्याच्या पराभवाचे कारण आहे असे रायुडू परखडपणे म्हणाला.