IPL 2024 – अखेर राजस्थान हरले; गुजरातचा शेवटच्या चेंडूवर विजय

15 चेंडूंत 45 धावांची गरज असताना राशीद खान आणि राहुल तेवतियाने केलेली अफलातून फलंदाजी आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना राशीद खानने आवेश खानला ठोकलेल्या खणखणीत चौकाराच्या जोरावर गुजरात टायटन्सने आपल्या पराभवाची मालिका खंडित केली. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सलग चार विजयासह अपराजित असलेला राजस्थान रॉयल्स जिंकता जिंकता हरला.

संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी तिसऱया विकेटसाठी केलेल्या 130 धावांच्या झंझावाती भागीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 3 बाद 196 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली होती. संजूने 38 धावांत नाबाद 68 तर यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पाडणाऱया रियानने 48 चेंडूंत 76 धावा ठोकल्या.

राजस्थानने उभारलेल्या 197 धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि शुबमन गिलने 64 धावांची सलामी दिली. पण ही भागी अपेक्षेप्रमाणे वेगवान नव्हती. कुलदीप सेनने साईला पायचीत करून पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मॅथ्यू वेड आणि अभिनव मनोहरचा त्रिफळा उडवत राजस्थानची सामन्यात स्थिती मजबूत केली. शुबमनने जोरदार खेळ करत गुजरातला सामन्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण विजयापासून 65 धावा दूर असताना गिलची खेळी 72 धावांवर संपली आणि सामना राजस्थानच्या दिशेने झुकला.

4 षटकांत 59 धावा हव्या असताना अश्विनचा गोलंदाजीवर शाहरूख खान आणि राहुल तेवतियाने 17 धावा काढल्या. मग आवेश खानने 16 चेंडूंत 40 धावांची गरज असताना शाहरूखला बाद केले. सामना गुजरातच्या आवाक्याबाहेर होता. तेव्हाच राजस्थानला तीन विकेट मिळवून देणाऱया कुलदीप सेनने 19व्या षटकात भरकटलेला मारा करत राहुल-राशीदला 20 धावा मोजून सामन्यावर आपली पकड सैल केली. 6 चेंडूंत 15 धावांनी दूर असलेल्या गुजरातला राशीदने आवेशच्या पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा काढत विजयासमीप आणले. 2 चेंडूंत 4 धावा हव्या असताना राहुल 3 धावा काढण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला आणि मग राशीदने शेवटच्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावत राजस्थानच्या स्पर्धेतील पहिल्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. 11 चेंडूंत 4 चौकारांसह 24 धावा करणारा राशीद खान विजयाचा मानकरी ठरला.