बायडेन यांचा नेतन्याहूंना फोन; दिला गंभीर इशारा, युद्ध थांबवा, नाहीतर अमेरिकेचं धोरण बदलेल!

joe-biden-benjamin-netanyahu

 

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना गाझामधील इस्रायल-हमास युद्धात ‘तात्काळ’ युद्धविराम आणि ‘विलंब न करता’ ओलिस करार करण्यासाठी अल्टिमेटम दिला. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यापासून वॉशिंग्टननं पहिल्यांदाच आपल्या मित्रराष्ट्राच्या पंतप्रधानांना इतक्या कडक शब्दात ठणकावलं आहे.

गाझामध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या दुहेरी नागरिकांसह सात अन्न पुरवठा करणाऱ्या कामगारांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इस्रायलला आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरे जावे लागत आहे.

गाझामध्ये इस्रायलच्या जोरदार हल्ले सुरू आहेत. या भयंकर हल्ल्यांबद्दल अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये 33,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसंच हमासच्या ताब्यात असलेल्या सुमारे 100 ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात तात्काळ युद्धबंदीसाठी दबाव आणला आहे.

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, बायडेन यांनी नेतन्याहू यांना फोनवर सांगितलं की पॅलेस्टिनी नागरिक आणि मदतकार्य करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले पाहिजे अन्यथा अमेरिका हमासविरूद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करेल.

बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धानंतरच्या परिणामांबद्दल काही बोलले नाहीत. नेतान्याहू यांच्याशी जो बायडेन यांनी केलेलं संभाषण ‘रोखठोक’ आणि ‘प्रामाणिक’ होते.

नेतन्याहू यांनी नेमकी कोणती पावलं उचलावीत आणि इस्रायली पंतप्रधानांनी वॉशिंग्टनच्या इशाऱ्यांचं पालन केलं नाही तर ते काय करतील हे मात्र व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलेलं नाही.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि येऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इस्रायल ‘पूर्णपणे युद्ध हरताना दिसत आहे’ आणि ‘हे युद्ध थांबवा’ असा सल्ला देखील त्यांनी दिला. संघर्ष संपवण्यासाठी त्वरीत तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

बायडेन यांनी गाझामधील इस्रायलच्या हल्ल्याला पाठिंबा काढण्याची धमकी दिल्याच्या काही तासांनंतर, इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळानं इस्रायल आणि उत्तर गाझा दरम्यान इरेझ सीमा ओलांडणे पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली.